भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला असून असाच विक्रम विराट टीम शुक्रवारी एकदिवसीय मालिकेत करते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आम्ही इतिहास न बघता केवळ वर्तमानावर लक्ष केंद्रीत करतो असं कोहली व रवी शास्त्रीनं दौऱ्याच्या सुरूवातीला सांगितलं होतं. परंतु कसोटी मालिका जिंकल्यानंतर त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याचं सांगण्यास टाळलं नाही. त्यामुळे शुक्रवारी तिसरा एकदिवसीय सामना जिंकून २-१ असा मालिका विजय साजरा करण्याचं नक्कीच त्यांच्या डोक्यात घोळत असणार.

भारतानं जागतिक स्पर्धा व तीन संघातील कॉमनवेल्थ स्पर्धा ऑस्ट्रेलियात जिंकली आहे. परंतु ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिकेत हरवण्याचा विक्रम भारतानं केलेला नाही. तीन वर्षांपूर्वी भारत ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका खेळला होता, जी भारतानं १ – ४ अशा फरकानं गमावली होती.

कोहली व धोनी दोघांनीही शानदार खेळी करत दुसरा सामना भारताला जिंकून दिला. परंतु मधल्या फळीतले अन्य फलंदाज अपेक्षित कामगिरी करत नसल्याचे चित्र आहे. मात्र भारतीय गोलंदाज चांगलेच फॉर्मात असून भारताच्या विजयात त्यांचा वाटा मोलाचा असेल. मोहम्मद सिराज व खलील अहमद यांनी जास्त धावा दिल्यामुळे कदाचित त्यांना बसवण्यात येईल व पाचवा गोलंदाज म्हणून कुणाला खेळवायचं हे कोहलीला ठरवावं लागेल अशी शक्यता आहे.

कदाचित हार्दिक पांड्याचा बदली खेळाडू म्हणून गेलेल्या विजय शंकरची संघात वर्णी लागू शकते. त्याचा समावेश केल्यास मधल्या फळीतला उपयुक्त फलंदाज म्हणूनही तो कामास येऊ शकतो. तर विकेट घेणारा गोलंदाज हा अग्रक्रम असल्यास युवराज चहलचा समावेश अंतिम अकराजणांमध्ये होण्याची शक्यता आहे. कमी धावा देऊन बळी बाद करणं हे चहलचं वैशिष्ट्य असल्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच केदार जाधवला संघात घेण्याचा पर्यायही कोहलीपुढे आहे. उपयुक्त गोलंदाज व आक्रमक फलंदाज असा जाधवचा लौकिक असून अष्टपैलू खेळाडू घेण्यास कोहलीनं प्राधान्य दिलं तर केदार जाधव अकरा जणांमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

अर्थात, संघात कुणालाही स्थान मिळालं तरी कोहलीचं सगळं लक्ष तिसरा एकदिवसीय सामना जिंकून ऑस्ट्रेलियात आणखी एक इतिहास घडवण्याकडे असेल हे नक्की. हा इतिहास घडतो का हे उद्या शुक्रवारीच दिसेल.

Story img Loader