IND vs AUS, World Cup: भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत नसून त्याला डेंग्यू झाला आहे. शुबमन गिलचा ताप हा कमी झाला आहे की नाही? याची अपडेट मिळाली नाही. सध्या ज्याप्रकारच्या फॉर्ममध्ये तो आहे, ते पाहता त्याची प्लेइंग ११ मधील अनुपस्थिती हा संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. केवळ ऑस्ट्रेलियाच नाही तर गिल पुढील सामन्यातूनही बाहेर होऊ शकतो. भारताचा तिसरा सामना पाकिस्तानसोबत खेळला जाणार आहे आणि त्या सामन्यापर्यंत गिल तंदुरुस्त व्हावा अशी सर्वजण प्रार्थना करत आहेत. त्यांच्या संदर्भात नवीनतम अपडेट काय आहेत? जाणून घ्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या २ दिवस आधी बातमी आली होती की शुबमन गिलला डेंग्यू झाला आहे आणि त्याला ग्लुकोजचाही त्रास होत आहे. तो सतत सराव करतो, व्यायाम करतो आणि फिटनेससाठी कठोर परिश्रम करतो, त्यामुळे असे मानले जाते की तो लवकरच बरा होईल परंतु सध्या तो प्लेइंग ११ मधून बाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे पण हे सुरुवातीचे टप्पे आहेत आणि तो लवकरात लवकर परतावा अशी सर्वजण प्रार्थना करत आहेत. आता संघ व्यवस्थापनाकडून माहिती अशी येत आहे की, ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्धही खेळणे त्यांच्यासाठी कठीण आहे.
शुबमन गिल संघाबरोबर नाही, रोहित शर्माने दिले अपडेट
शुबमन गिल सध्या भारतीय टीमबरोबर नाही, तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. नाणेफेकीनंतर रोहित शर्मा म्हणाला, “तो सकाळपर्यंत गिलच्या रिकव्हरीची वाट पाहत होता पण तो अजून तयार नाही. त्याच्या जागी इशान किशन खेळत असून तो सलामीला येईल.”
भारतीय क्रिकेट संघाचा पुढील सामना ११ ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानशी आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार असून या सामन्यापर्यंत शुबमन गिल तंदुरुस्त नसण्याची दाट शक्यता आहे. मात्र, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात गिलचे पुनरागमन होऊ शकते. आजच्या सामन्यात त्याची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते आहे. याचे कारण म्हणजे, भारताने २ धावांवर तीन विकेट्स गमावल्या आहेत. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर हे तिघेही खाते न उघडता तंबूत परतले आहेत. त्यामुळे राहुल द्रविड काय विचार करतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियापुढे ठेवले २०० धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध ४९.३ षटकांत १९९ धावांत गारद झाला. हा सामना जिंकण्यासाठी भारताला ३०० चेंडूत केवळ २०० धावा करायच्या आहेत. मात्र, खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही. अशा स्थितीत भारताला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
दोन्ही संघांची प्लेईंग ११
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.