Border Gavaskar Trophy India Squad: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात सराव करत असताना संघाला एकामागून एक खेळाडूंच्या दुखापतींचा सामना करावा लागत आहे. आधी केएल राहुल मग शुबमन गिल आणि आता भारतीय संघातील एक खेळाडू दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. त्याच्या जागी नवा खेळाडू भारतीय संघात दाखल झाला आहे. या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी बीसीसीआयने एकूण १८ खेळाडूंचा भारतीय संघात समावेश केला आहे. त्याचबरोबर ३ खेळाडू राखीव म्हणून ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरूद्धची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच वेगवान गोलंदाज खलील अहमदला दुखापत झाली आहे. या मालिकेसाठी खलील अहमदची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र दुखापतीमुळे तो भारतात परतला आहे. खलीलला दुखापत झाल्याने तो नेटमध्ये गोलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला, त्यानंतर त्याला भारतात परत पाठवण्यात आले. आयपीएल लिलावापूर्वी खलील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही, कारण दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिलीज केले आहे.

हेही वाचा – Virat Kohli Viral Post: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीच्या पोस्टने उडवली खळबळ; पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

खलील अहमदच्या जागी आयपीएलमध्ये रिंकू सिंगकडून अखेरच्या षटकातील पाच चेंडूत पाच षटकार खाणाऱ्या यश दयालला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालचा भारताच्या राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. यश दयाल नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय टी-२० संघाचा भाग होता. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. जोहान्सबर्गहून तो थेट पर्थला पोहोचला आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला ही माहिती दिली, भारतीय संघाला सरावासाठी मिचेल स्टार्कसारख्या गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाची गरज असल्याने हा पर्याय आहे. दयाल भारत अ संघाकडून कसोटी सामना खेळणार होता पण त्याला दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आले.’

हेही वाचा – Champions Trophy: “BCCI नव्हे, भाजपा…”, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला न येण्यावरून शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराझ खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी, यश दयाल