IND vs AUS Yashasvi Jaiswal break Sachin Tendulkar record : मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी जैस्वालच्या शानदार खेळीच्या जोरावर ५ बाद १६४ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ८२ धावांचे योगदान देताना महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रम मोडला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक १४० धावांची खेळी खेळली. भारताकडून जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या तर रवींद्र जडेजाने ३ फलंदाज बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या प्रचंड धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारतीय डावाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. रोहित केवळ ३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने रोहित शर्माला बाद केले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने केएल राहुलसह आघाडी घेतली आणि भारताची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली.
https://twitter.com/WeTheHerd/status/1872749822153040255यशस्वी जैस्वालचे हुकले शतक –
केएल राहुल २४ धावा करून बाद झाला आणि त्यानंतर जैस्वालला साथ देण्यासाठी विराट कोहली क्रीजवर आला. दोन्ही फलंदाजांनी शानदार खेळ करत १०० हून अधिक धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दडपण आणले. मात्र, यादरम्यान एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना विराट आणि जैस्वाल यांच्यातील भागीदारी तुटली. सहकारी फलंदाज कोहलीसोबतच्या ताळमेळच्या अभावाने रनआऊट झाला. जैस्वालने ११८ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार आणि एक षटकार लगावला. यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला.
यशस्वी जैस्वालने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम –
पहिल्या डावात यशस्वी जैस्वालचे शतक हुकले असले, तरी त्याच्या ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर त्याने २२ वर्षीय सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. जैस्वालने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. २००२ मध्ये सचिनने १६ कसोटी सामन्यांच्या २६ डावांमध्ये १३९२ धावा केल्या होत्या, ज्यात ४ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश होता. आता यशस्वी जैस्वालने यावर्षी १५ कसोटी सामन्यांच्या २८ डावात १३९४ धावा केल्या आहेत. २०२४ साली कसोटीत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.