IND vs AUS Jasprit Bumrah statement on Sydney Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताचा ६ विकेट्सनी पराभव झाला. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा त्यांनी सहज पाठलाग केला. सिडनीत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याने संघाची धुरा सांभाळली. बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात अजिबात गोलंदाजी केली नाही. भारतीय कॅम्पला बुमराहची खूप आठवण झाली. याबद्दल त्यानेही खेदह व्यक्त केला. त्याचबरोबर आपल्या दुखापतीवरही त्याने प्रतिक्रिया दिली.
बुमराह ठरला मालिकावीर –
y
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकनंतर बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे मैदानात उतरला नाही. त्याने पहिल्या डावात दोन विकेट्स घेतले. तिसऱ्या दिवशी तो फलंदाजीला आला पण तीन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. रविवारी तो गोलंदाजीसाठी उपलब्ध नव्हता. बुमराहने आता दुखापतीवर मौन सोडले आहे. संपूर्ण ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याने भेदक गोलंदाजी केली. बुमराहने या मालिकेत एकूण ३२ विकेट्स घेतल्या. त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार देण्यात आला.
तुम्ही तुमच्या शरीराशी लढू शकत नाही –
सामन्यानंतर बोलताना जसप्रीत बुमराह म्हणाला, “हे थोडे निराशाजनक आहे. परंतु कधीकधी तुम्हाला तुमच्या शरीराचा आदर करावा लागतो. तुम्ही तुमच्या शरीराशी लढू शकत नाही. हे निराशाजनक आहे. कदाचित मालिकेतील सर्वोत्तम विकेटवर गोलंदाजी करण्यापासून वंचित राहिलो. पहिल्या डावातील माझ्या दुसऱ्या स्पेलमध्ये मला थोडे अस्वस्थ वाटले आणि मला त्याकडे लक्ष द्यावे लागले. मात्र, एक गोलंदाज कमी असूनही इतर गोलंदाजांनी पुढे येत पहिल्या डावात जबाबदारी स्वीकारली. आज सकाळचे संभाषण देखील विश्वास आणि उत्कटतेबद्दल होते.”
संपूर्ण मालिकेत चांगली टक्कर पाहायला मिळाली –
जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला, “बऱ्याचदा जरा आणि तर अशी स्थिती होती, पण संपूर्ण मालिकेत चांगली टक्कर पाहायला मिळाली. आम्ही खेळातून बाहेर नव्हतो. आम्ही आजही खेळात होतो. कसोटी क्रिकेट अशा प्रकारे चालते. तसेच खेळात दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी, दबाव निर्माण करणे, दबाव हाताळणे आणि परिस्थितीनुसार खेळणे हे सर्व महत्त्वाचे आहे. तुम्हाला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते आणि या गोष्टी आम्हाला भविष्यात मदत करतील.”
हेही वाचा – IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक
आमच्या टीममध्ये खूप प्रतिभा –
युवा खेळाडूंबद्दल बोलताना बुमराह म्हणाला, “युवा खेळाडूंनी भरपूर अनुभव घेतला आहे आणि ते आणखी ताकदीने पुढे जातील. आमच्या टीममध्ये खूप प्रतिभा आहे. आम्ही जिंकू शकलो नाही म्हणून अनेक युवा खेळाडू निराश झाले आहेत पण या अनुभवातून ते शिकतील. पण खूप छान मालिका होती. ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन, त्यांनी खरोखरच चांगली कामगिरी केली.” भारताने मालिका गमावली असली तरी, बुमराहचा विश्वास आहे की ही एक आव्हानात्क मालिका होती. ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनंतर भारताविरुद्ध ३-१ ने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली.