IND vs AUS, World Cup Yuvraj Singh on Shreyas Iyer: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात भारताची टॉप ऑर्डर पूर्णपणे विस्कळीत झाली होती. भारताने अवघ्या २ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. इशान किशन आणि रोहित शर्मा या दोघांना खातेही उघडता आले नाही. यानंतर श्रेयस अय्यरही खराब शॉट खेळून शून्यावर बाद झाला. यावर माजी खेळाडू युवराज सिंगने टीम इंडियाच्या फलंदाजीवर टीका करत भारतीय संघाला विश्वचषकादरम्यान संघ व्यवस्थापनाला अय्यरवर काम करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, त्याने श्रेयसच्या खराब शॉटवर संताप व्यक्त करत के.एल. राहुलचा विचार व्हावा असे देखील म्हटले.
चेन्नईच्या काल झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले मात्र, तो विशेष काही करू शकला नाही आणि खराब फटका खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. अय्यरला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर युवराज नाराज दिसत आहे. त्याने अय्यरचे कान टोचले असून के.एल. राहुलला चौथ्या क्रमांकावर बढती मिळावी अशी मागणी देखील केली आहे.
युवराजने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर लिहिले, “चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाला दबाव सहन करावा लागेल. संघ जेव्हा डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा श्रेयस अय्यरकडून चांगल्या आणि प्रगल्भ विचारांची गरज आहे. लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर का फलंदाजी करत नाही हे अजूनही समजत नाही. पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकल्यानंतर फॉर्मात दिसत आहे. जर अजूनही कळत नसेल अय्यरला तर के.एल. राहुलला पुढे संधी द्यावी. कोहलीचा झेल सोडण्याची मोठी किंमत ऑस्ट्रेलियाला चुकवावी लागू शकते. कारण, तो झेल हा सामना ऑस्ट्रेलियापासून दूर नेऊ शकतो हे त्याच वेळी सिद्ध झाले होते.”
कोहलीचा जो ड्रॉप कॅच युवराज सिंग सांगत होता तो मिचेल मार्शने सोडला. भारतीय डावाच्या सुरुवातीला मार्शने कोहलीचा झेल सोडला होता. विराट कोहली १२ धावांवर खेळत होता पण त्यानंतर कोहलीने कोणतीही चूक केली नाही आणि सावधपणे डाव पुढे नेण्यास सुरुवात केली आणि राहुलबरोबर चौथ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली. याचा टीम इंडियाच्या विजयात उपयोग झाला.
युवराजची भविष्यवाणी खरी ठरली
कोहलीच्या ड्रॉप कॅचबद्दल युवराजचे भाकीत खरे ठरले कारण, भारताच्या माजी कर्णधाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार खेळी खेळण्यासाठी मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर उपयोग केला. ३४ वर्षीय खेळाडूने ११६ चेंडूत ८५ धावा केल्या तर राहुल ९७ (११५) धावांवर नाबाद राहिला आणि भारताने पाच वेळा विश्वविजेत्यावर सहा गडी राखून विजय मिळवला.