ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यामुळे मालिका गमावलेला भारतीय संघ बुधवारी उरलेला सन्मान वाचवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. गोलंदाजांच्या अपयशी कामगिरीमुळे भारताला धावांचे इमले रचूनही पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला उर्वरित दोन सामन्यांत लाजिरवाणा पराभव टाळण्यासाठी खटपट करावी लागणार आहे, तर ऑस्ट्रेलिया मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारतात होऊ घातलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात होते. त्यामुळे मालिकेत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर भारताची परीक्षाच होती. त्यात फलंदाजांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले असले तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या आघाडय़ांवर भारताने सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळेच तीनशे धावा उभ्या करूनही भारताला विजय मिळवता आलेला नाही. कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियमवर भारत पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. यापूर्वी २००७-०८च्या तिरंगी मालिकेत भारताला या मैदानावर श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या मालिकेतील संघात महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांचा समावेश होता. हे तिघे वगळता बुधवारच्या लढतीतील संपूर्ण संघ नवा आहे.
भारताच्या फलंदाजीचा विचार केल्यास रोहित शर्मा़, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी चांगल्या फॉर्मात आहेत. चौथ्या लढतीतही त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र, गोलंदाजी हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव व बरिंदर सरण यांना प्रभाव पाडता आलेला नाही. फिरकीपटू आर. अश्विन व रवींद्र जडेजा यांचा माराही ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांवर बोथट ठरला आहे. त्यामुळे यांना उर्वरित दोन सामन्यांत चांगली कामगिरी करावीच लागेल.
दुसरीकडे, मालिका विजय निश्चित केल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघातील वातावरण आरामदायी आहे. त्यात डेव्हिड वॉर्नर परल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला बळकटी मिळाली आहे. ग्लेन मॅक्सवेलनेही तिसऱ्या सामन्यात संयमी खेळी साकारत फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. गोलंदाजीतही बाजू वरचढ असल्यामुळे ऑस्ट्रेलिया मालिकेत निभ्रेळ यश मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा