बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात पहिला एकदिवसीय सामना रविवारी (४ डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याचा हा निर्णय अतिशय योग्य ठरल्याचे दिसले, कारण भारताने पहिल्या चार विकेट १००च्या आतच गमावल्या. केएल राहुल याने ७३ धावा केल्याने भारताने ४१.२ षटकात सर्वबाद १८६ धावसंख्या उभारली.
टीम इंडियाची फलंदाजीला यजमानांच्या गोलंदाजांनी सपशेल खोटे ठरवत अवघ्या १८६ धावांत सर्वबाद करत रोखले. आम्ही फक्त कागदावर ताकदवान आहोत असेच चित्र आजच्या सामन्यातून समोर आले आहे. यावेळी बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन यांची गोलंदाजी प्रभावशाली ठरली. त्याने भारताच्या डावाच्या ११व्या षटकात कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्या विकेट घेतल्या. यामुळे संघ अडचणीत आला. रोहित २७ आणि विराट ९ धावा करत बाद झाले. त्याचबरोबर भारताने पहिली विकेट शिखर धवन याची गमावली. तो ५.२ षटकात मेहदी हसन मिराज याचा बळी ठरला. हसनने धवनला ७ धावांवर असताना त्रिफळाचीत केले.
शाकिबने १० षटकात ३६ धावा देत ५ गडी बाद करत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. यामध्ये त्याने दोन षटके निर्धाव टाकली. भारताची २०० धावा गाठण्याची आशाही जवळपास संपुष्टात आली. एक सन्मानजनक धावसंख्या उभारेल असे वाटत असताना भारतीय फलंदाजी ढेपाळली. फक्त राहुलने ७० चेंडूत ७३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि चार षटकार मारले. त्याने इबादत हसनच्या चेंडूवर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट इनामूलकडे गेला आणि त्याने उत्कृष्ट झेल घेतला. भारताची धावसंख्या ४० षटकांनंतर ९ बाद १७९ अशी होती. आता मोहम्मद सिराज आणि कुलदीप सेन क्रीजवर असताना एक-दोन मोठे फटके मारत २०० पार धावसंख्या होईल असे वाटत होते मात्र त्यांना देखील ते फटके मारण्यात अपयश आले. इबादत हसनने या सामन्यात तीन गडी बाद करत शाकीबला साथ दिली.