न्यूझीलंडनंतर भारताचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन मर्यादित षटकांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यात अनेकांना विश्रांती दिली होती, आता ते सर्व खेळाडू बांगलादेशच्या दौऱ्यात परतले आहेत. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांचा समावेश आहे. बांगलादेश दौऱ्याची सुरूवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. बांगलादेश विरुद्ध भारत पहिला एकदिवसीय सामना रविवारी (४ डिसेंबर) शेर ए बांगला स्टेडिय, ढाका येथे खेळला जात आहे.
बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाला फलंदाजीला आमंत्रित करत त्यांनी धावांचा पाठलाग करणे पसंत केले. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात येताच रोहित शर्माने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. वास्तविक, आता रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अझहरने केलेल्या धावांचा आकडा पार करण्यात यश मिळवले आहे. मोहम्मद अझरुद्दीनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९३७६ धावा केल्या आहेत, तर आता रोहित त्याच्या पुढे गेला असून त्याने बाद होण्याआधी पर्यंतच्या केलेल्या धावांचा विचार करता त्याने ९३७८ धावा केल्या.
सामन्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रोहित शर्मा व शिखर धवन ह्या मुख्य जोडीने सलामीला मैदानावर येत भारताची सुरुवात केली. लोकेश राहुल देखील या सामन्यात आहे मात्र तो मधल्याफळीत फलंदाजी करणार असून यष्टींमागे यष्टीरक्षण करताना दिसेल. कुलदीप सेनने आजच्या सामन्यात पदार्पण केले आहे. रोहित-धवनने संयमी सुरुवात केली होती. चौथ्या डावात बांगलादेशने फिरकीपटू मेहिदी हसनला गोलंदाजीला आणले. त्याने सहाव्या षटकात भारताला पहिला धक्का दिला. धवन रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहित व विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शाकिब अल हसनने एकाच षटकात दोघांना बाद केले. त्याने रोहितला २७ धावांवर त्रिफळाचीत केले, तर तिसऱ्या चेंडूवर विराटचा ९ धावांवर लिटन दासने अफलातून झेल घेतला. भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज ४९ धावांवर माघारी परतले. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने राहुल बरोबर डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तो अवघ्या २४ धावा करून बाद झाला. सध्या भारताची धावसंख्या ही ९२ वर ४ गडी बाद अशी आहे.
मर्यादित षटकांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितने सहावे स्थान पटकावताना मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले १८४२६ – सचिन तेंडुलकर १२३४४ – विराट कोहली ११२२१ – सौरव गांगुली १०७६८ – राहुल द्रविड १०५९९ – महेंद्रसिंग धोनी ९३७८* – रोहित शर्मा ९३७६ – मोहम्मद अझरुद्दीन