सध्या भारत आणि बांगलादेश या संघामध्ये एकदिवसाय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. ४ डिसेंबर) ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात बांगलादेश संघाने अक्षरशः भारतीय संघाच्या जबड्यातून विजय हिसकावला. अखेरच्या जोडीने नाबाद ५४ धावांची भागीदारी करत बांगलादेशला एक गडी राखून विजय मिळवून दिला. एकवेळ विजयाच्या अतिशय जवळ असताना भारतीय संघाला हा पराभव पत्करावा लागला. भारताच्या या पराभवाची काही कारणे देखील आहेत.
या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण वरिष्ठ फलंदाजांनी केलेल्या अतातायीपणा ठरले. संघाचा सलामीवीर शिखर धवन ७, कर्णधार रोहित शर्मा २७ व अनुभवी विराट कोहली ९ यांना मोठ्या खेळा करण्यात अपयश आले. पहिल्या तीन क्रमांकावर खेळणाऱ्या या खेळाडूंपैकी एकाने जबाबदारी घेत मोठी खेळी केली असती तर, भारत मोठी धावसंख्या धावफलकावर लावू शकला असता. भारतीय संघ आपल्या डावात केवळ ४१.२ षटकात १८६ धावा करत सर्वबाद झाला होता. यावरच ट्विटर ट्विट करत काही चाहत्यांनी कठोर शब्दात भारताच्या फलंदाजीवर टीका केली आहे. टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर टीकेची झोड उठतच होती. त्यात न्यूझीलंड दौऱ्यातील शिखर धवनच्या नेतृत्वाखाली झालेला एकदिवसीय सामन्यातील मालिका पराभव आणि आजचा बांगलादेश विरुद्धचा सामना. यामुळे चाहते प्रचंड नाराज आहेत.
एका चाहत्याने तर थेट असे ट्विट करत म्हटले की, “ बांगलादेश चांगला खेळला. या भारतीय संघाला पुन्हा क्रिकेटच्या सामान्य ज्ञानाचे धडे देण्याची गरज आहे. फलंदाजीला खेळायला सुरुवात करण्यासाठी बेटिंग अॅप्स विकण्यापासून ते संघ निवड करण्याच्या जाहिराती याच्यातून त्यांना वेळ मिळायला हवा. नुसते कॅमेरासमोर बोलून काही होत नाही. सगळ्यांनी मिळून यांना जाब विचारण्याची आता वेळ आली आहे.”
“भारतीय संघाने या सामन्यात चार वेगवान गोलंदाज तर दोन फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती. या सर्वांनी आधी टिच्चून गोलंदाजी केली. मात्र, अखेरच्या जोडी विरोधात या गोलंदाजांनी यॉर्कर चेंडूंचा वापर अतिशय कमी केला. तसेच, या गोलंदाजांचे बाऊन्सर तितके घातक नव्हते.” असेही एका चाहत्याने कमेंट केली आहे. भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांपैकी एक मानले जाते. या सामन्यातही भारतीय संघाने चांगले क्षेत्ररक्षण केले. मात्र, अखेरच्या काही षटकांमध्ये केएल राहुलने एक झेल सोडला. तर, वॉशिंग्टन सुंदर याचे झेल घेताना प्रयत्न अपुरे पडले. तसेच भारतीय खेळाडूंनी काही अतिरिक्त धावा देखील क्षेत्ररक्षण करताना दिल्या. यावरूनही त्या दोघांवर खूप टीका होताना दिसत आहे.