भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी गेल्या काही सामन्यांमध्ये भेदक मारा करतो आहे. विशेषकरुन दुसऱ्या डावात शमीचा मारा अधिक प्रभावशाली ठरतोय. कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात गेल्या दोन वर्षांत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मान मोहम्मद शमीने पटकावला आहे.
२९ वर्षीय मोहम्मद शमीने गेल्या दोन वर्षांत २० डावांमध्ये ५० बळी घेतले आहेत. ३२.२ चा स्ट्राईक रेट आणि १७.२ च्या सरासरीने शमी कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात सर्वोत्तम कामगिरी करतो आहे. गेल्या दोन वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या डावात २५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमीची कामगिरी अव्वल ठरली आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयन यांची कामगिरी सध्याच्या घडीला शमीच्या जवळपास जाणारी आहे. कमिन्सने आतापर्यंत ४८ तर लॉयनने ४७ बळी घेतले आहेत.
शमी, कमिन्स आणि लॉयन या गोलंदाजांव्यतिरीक्त या यादीमध्ये कगिसो रबाडा (३४ बळी), रविंद्र जाडेजा (३२ बळी), जसप्रीत बुमराह (२९ बळी), जोश हेजलवुड (२९ बळी) हे गोलंदाज आहेत. कसोटीत दुसऱ्या डावात फिरकीपटू गोलंदाज अधिक बळी घेतात, मात्र शमीने गेल्या काही वर्षांत आपल्या गोलंदाजीमध्ये केलेली सुधारणा ही नक्कीच वाखणण्याजोगी आहे. बांगलादेशआधी भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका ३-० ने जिंकली होती, या मालिकेतही भारताच्या विजयात शमीचा मोठा वाटा होता.