भारत आणि बांगलादेश संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना कालपासून चट्टोग्रामच्या मैदानार सुरु झाला आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस असून भारतीय संघाने ६ बाद २७८ धावावरुन पुढे खेळायला सुरुवात केली आहे. दरम्यान भारतीय संघाला श्रेयस अय्यरच्या रुपाने सातवा झटका बसला आहे. त्याचे १४ धावांनी शतक हुकले.
श्रेयस अय्यरने बाद होण्यापूर्वी ८६ धावांची शानदार खेळी. त्याने आपल्या खेळीत १९२ चेंडूचा सामना करताना १० चौकार लगावले. त्याला इबादोत हुसेनने त्रिफळा उडवला. तो बाद झाल्यानंतर भारतीय संघाने १०४ षटकांत ७ बाद ३०१ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि पुजाराने केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारतीय संघ इथपर्यंत पोहोचू शकला. बांगलादेश संघाकडून तैजुल इस्लामने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत. मेहदी हसनने २ आणि खालीद अहमदने १ विकेट घेतली.
बुधवारी भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय सलामी फलंदाज शुबमन गिल (२०) आणि केएल राहुल (२२) बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारने शानदार खेळी साकारताना भारतीय संघाचा डाव सावरला. परंतु अवघ्या १० धावांनी त्याचे शतक हुकले. त्याने २०३ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ९० धावा केल्या. त्याचबरोबर ऋषभ पंतने ४६ धावांचे योगदान दिले.
जयदेव उनाडकट भारतीय संघात दाखल –
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला होता, पण व्हिसाच्या समस्येमुळे त्याला बांगलादेशमध्ये पोहोचण्यास थोडा विलंब झाला. त्यामुळे पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो खेळू शकला नसला, तरी तो गुरुवारी पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या पथकात सामील झाला आहे.