झहूर अहमद चौधरी स्टेडियम चट्टोग्राम येथे भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्यातील आज दुसरा दिवस आहे. भारताने आपल्या पहिल्या डावात ४०४ धावा केल्या आहेत. तसेच बांगलादेशच्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत ४४ षटकांत ८ बाद १३३ धावा केल्या आहेत. त्यामुळे बांगलादेश संघ अजूनही २७१ धावांनी पिछाडीवर असल्याने अडचणीत सापडला आहे.
बांगलादेश संघाला पहिला धक्का नजमुल हुसेन शांतोच्या रुपाने बसला. तो संघाचे आणि स्वत:चे खात्य उघडण्या अगोदर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ यासिर अली देखील ४ धावा काढून बाद झाला. त्यामुळे बांगलादेश संघ अडचणीत आला. त्यानंतर २४.२ षटकात बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत परतला होता. तेव्हा संघाची धावसंख्या ७५ अशी होती. दरम्यान यानंतर ही संघाची पडझड सुरु राहिल्याने संघ दबावात सापडला.
बांगलादेशकडून फलंदाजी करताना मुशफिकर रहीमने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५८ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. त्याचबरोबर लिटन दास (२४) आणि झाकिर हसनने (२०) थोड्या प्रमाणात धावा केल्या. मात्र इतर चार फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या सुद्धा पार करता आली नाही. त्यामुळे बांगलादेशने ४४ षटकाच्या समाप्तीनंतर ८ बाद १३३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारताच्या तुलनेत २७१ धावांनी मागे आहेत.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मेहदी हसन १६ आणि इबादोत हुसेन १३ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, फिरकीपटू कुलदीप यादवने सर्वादिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने दुसऱ्या बाजूने वेगवान मारा सुरुच ठेवताना ३ विकेट्स घेतल्या. तसेच उमेश यादवने १ विकेट घेतली.