IND vs BAN 1st Sanjay Manjrekar react on Virat Kohli DRS blunder : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे विराट कोहली बाद झाला, त्यावरुन बरीच चर्चा सुरु आहे. दुसऱ्या डावात विराटला एलबीडब्ल्यू आऊट करण्यात आलं. विराटला डीआरएस घेण्याची संधी होती. मात्र, त्यांनी डीआरएस घेतला नाही. पण जेव्हा रिप्ले पाहण्यात आला, तेव्हा पॅडला लागण्यापूर्वी चेंडू बॅटला लागल्याचे दिसले, यावर आता माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी एक्स ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहलीच्या डीआरएस गोंधळावर संजय मांजरेकरांची प्रतिक्रिया –

माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीच्या डीआरएस चुकीवर ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, “आज विराटसाठी वाईट वाटलं. साहजिकच त्याला वाटले असेल की चेंडू बॅटला लागला नसेल. पण त्याने किमान गिलकडून जाणून घ्यायचे होते की, चेंडू स्टंपवर आदळत आहे का नाही? गिलने त्याला डीआरएस घेण्यास सागितले होते. परंतु विराटला आपल्या संघासाठी ३ डीआरएस राखून ठेवायचे होते, त्यामुळे तो निराश होऊन माघारी परतला.”

विराट कोहलीने रिव्ह्यू न घेतल्याने रोहित शर्मा वैतागला –

विराट कोहलीच्या एलबीडब्ल्यूचा रिप्ले पाहिल्यानंतर रोहित शर्माही नाराज दिसत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट असं जाणवत होतं की विराट कोहलीने रिव्ह्यू घ्यायला हवा होता. त्याचबरोबर स्क्वेअर लेगवर उभे असलेले अंपायर रिचर्ड केटलबरो विराटच्या डीआरएस न घेण्याच्या निर्णयावर हसताना दिसले. कारण विराटने डीआरएस घेतला असता, तर तो नाबाद राहिला असता आणि त्याला मोठी खेळी साकारता आली असती.

हेही वाचा – Virat Kohli : ‘यॉर्करवर यॉर्कर टाकतोयस, तू काय मलिंगा…’, विराटने शकीबला विचारलेला प्रश्न स्टंप माईकमध्ये कैद, VIDEO व्हायरल

विराट कोहलीच्या विकेटनंतर ऋषभ पंत आणि शुबमन गिल भारताचा डाव सांभाळत आहेत. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद ८१ धावा केल्या होत्या. ज्यामुळे भारताकडे एकूण ३०८ धावांची आघाडी होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी वृत्त लिहिपर्यंत भारताने ४२ षटकानंतर ३ बाद १४८ धावा केल्या आहेत. शुबमन गिल ६४ आणि ऋषभ पंत ४८ धावांवर खेळत आहेत.