भारत आणि बांगलादेश या संघामध्ये चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील तिसरा दिवसाचा खेळ सुरु आहे. भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. तत्पुर्वी बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. यामध्ये सर्वात जास्त योगदान कुलदीप यादवचे होते. त्याने पाच विकेट्स घेताना एका खास विक्रमाची नोंद केली आहे.
भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विजयाचा मजबूत पाया रचला आहे. ४०४ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळून भारताने २७४ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर फॉलो ऑन न देता भारतीय फलंदाज पुन्हा मैदानावर उतरले. शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा या जोडीने बांगलादेशच्या नाकी नऊ आणले. आजच्या सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. शुबमन गिल बाद होता का नाबाद याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
नेमकी काय घटना घडली?
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील ३२व्या षटकात यासिर अलीच्या गोलंदाजीवर गिल पायचीत झाला (LBW) होता. मैदानावरील पंचाने त्याला नाबाद देताच शाकिब अल हसनने डीआरएस (DRS) घेतला. बांगलादेशच्या खेळाडूंना ही विकेट मिळेल हा आत्मविश्वास होता आणि ते मोठ्या आशेने स्क्रिनकडे डोळे लावून पाहत होते. तितक्याच तिसऱ्या थर्ड अम्पायर म्हणजेच तिसऱ्या टेलीव्हिजन पंचानी मॅसेज केला की डीआरएस सिस्टम बंद पडली आहे आणि ते ही विकेट तपासू शकत नाही. त्यामुळे गिल नाबाद राहिला.
यातून या डीआरएस सिस्टीमवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर तांत्रिक बाबीत बिघाड होत असेल तर मग आपण यावर काय तोडगा काढू शकतो याकडे आयसीसीने विचार करायला हवा अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे. पण नशीब बलवत्तर म्हणून अजूनही शुबमन गिल खेळपट्टीवर टिकून आहे. त्यावेळी तो ७० धावा करून खेळत होता. भारताच्या त्यावेळी १३१ धावांवर १ गडी बाद अशी स्थिती होती. सध्या तो शतकाच्या उंबरठ्यावर असून भारत देखील मजबूत स्तिथीत आहे.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांच्या अर्धशतकी खेळीमुळे सर्वबाद ४०४ धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात जेव्हा बांगलादेशचा संघ फलंदाजीस उतरला तेव्हा संघाने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली आणि गडी बाद होण्याचे सत्र सुरूच राहिले. ज्यामुळे संघाचा पहिलाच डाव ५५.५ षटकात १५० धावसंख्येवर संपुष्टात आला.
चट्टोग्राम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी डावखुऱ्या हाताच्या या चायनामन फिरकीपटूने ही कामगिरी केली. कुलदीपने ४० धावा देत ५ गडी बाद केले. याआधी हा विक्रम आर अश्विन याच्या नावावर होता, ज्याने २०१५ मध्ये फतुल्लाह येथे ८७ धावा देत ५ गडी बाद केले होते. अनिल कुंबळे यांनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन चट्टोग्राममध्येच केले होते. त्यांनी या मैदानावर ५५ धावा देत ४ गडी बाद केले होते.