कसोटी क्रिकेटमध्ये लोकेश राहुलची खालावलेली कामगिरी पाहून निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत रोहित शर्माला सलामीला येण्याची संधी दिली. रोहितने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत, कसोटीतही सलामीच्या स्थानावर आपला हक्क सांगितला. आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात रोहितने ३ शतकं झळकावत चौकार-षटकारांची आतषबाजी केली होती.

अवश्य वाचा – IND vs BAN : मयांकची द्विशतकी खेळी, मात्र ब्रॅडमन यांचा विक्रम थोडक्यात बचावला

मात्र रोहित शर्माच्या षटकारांच्या एका विक्रमाला मयांक अग्रवालने आव्हान दिलं आहे. २०१९ सालात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मयांक दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्याच्या नावावर सध्या १८ षटकारांची नोंद आहे. रोहित शर्मा या यादीत १९ षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे येत्या काही काळात मयांक रोहितला चांगलंच आव्हान देणार असं दिसतंय.

दरम्यान पहिल्या डावातील द्विशतकी खेळीत मयांकने माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. कसोटीत एका डावात सर्वाधिक षटकार लगावण्याच्या विक्रमाशी मयांकने बरोबरी केली. मयांकने बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात ८ षटकार खेचले.

द्विशतक झळकावल्यानंतर मयांकने पुन्हा एकदा फटकेबाजी सुरु केली. मात्र मेहदी हसनच्या गोलंदाजीवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात अबु जायेदने सीमारेषेवर त्याचा झेल पकडला. मयांकने ३३० चेंडूचा सामना करत २४३ धावा केल्या, त्याच्या या खेळीत २८ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : मयांकचं द्विशतक, अनोखी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

Story img Loader