IND vs BAN 1st test Ravichandran Ashwin reacts to India won against Bangladesh : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताने बांगालादेशचा २८० धावांनी धुव्वा उडवला. त्याचबरोबर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने बॉल आणि बॅट दोन्हीने दमदार कामगिरी केली. प्रथम त्याने फलंदाजी करताना शतक झळकावले आणि नंतर गोलंदाजी करताना दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे या सामन्यातील सामनावीर पुरस्कार अश्विनला देण्यात आला. तो भारताच्या विजयानंतर आणि त्याच्या चमकदार कामगिरीनंतरही तो नक्की आनंदी होता का? जाणून घेऊया.

वाढदिवसाला गिफ्ट न मिळाल्याने अश्विन नाराज?

खरंच, अश्विनला त्याच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवशी कोणीही गिफ्ट दिले नाही याचे दुःख होते का? बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर अश्विनने याचा खुलासा केला. गेल्या मंगळवारी (१७ सप्टेंबर) अश्विने त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा केला होता. सामन्यानंतर बोलत असताना हर्षा भोगले अश्विनला म्हणाला की, मी ऐकले आहे की, लोक ज्याचा वाढदिवस आहे त्याला गिफ्ट देतात. पण तू तर स्वत: ला चांगले गिफ्ट दिले आहेस. यावर उत्तर देताना अश्विन म्हणाला की, “माझा वाढदिवस होता त्या दिवशी मला कोणीही गिफ्ट दिले नाही, त्यामुळे मी स्वतःला गिफ्ट देण्याचा विचार केला. पण हा विनोदाचा भाग आहे.” यानंतर दोघे पण हसताना दिसले.

अश्विन कोणाच्या ॲक्शनची नक्कल करायचा?

विजयानंतर बोलताना रविचंद्रन अश्विन म्हणाला, “या कसोटी सामन्यावर माझा काय प्रभाव पडला, यावर मी भाष्य करू इच्छित नाही. मला खूप मोठी भूमिका बजावायची होती, मी हरभजनच्या जागी भारतीय संघात आलो होतो. ज्युनियर क्रिकेटमध्ये मी त्यांच्या ॲक्शनची नक्कल करायचो, ते माझ्यासाठी प्रेरणास्थान होते. आयपीएलमधून आल्यानंतर, मी कसोटीत चांगली कामगिरी करू शकेन की नाही, याबद्दल लोकांना नेहमीच शंका होती. बरेच लोक आले आणि मला मदत केली.”

हेही वाचा – IND vs BAN : रविचंद्रन अश्विनने ऐतिहासिक शतकासह लावली विक्रमांची रांग, पाहा पराक्रमांची यादी

घरच्या स्टेडियमबद्दल अश्विनचा पहिला अनुभव –

घरच्या स्टेडियमबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, “एकेकाळी हे मैदान काँक्रीटच्या ब्लॉक्सचे बनलेले होते आणि माझा पहिला अनुभव सचिन तेंडुलकर सरांना मॅक बी स्टँडवरून पाहण्याचा होता. त्यावेळी मी मनाशी ठरवले होते की, एके दिवशी मला या खास मैदानावर खेळायचे आहे. कोणती तरी शक्ती मला या मैदानाकडे खेचते. मला माहित नाही की ते किती काळ चालत राहिल. पण मला इथे परत यायला आवडते.”