IND vs BAN 1st Test Shubman Gill React on Bangladesh Spinners : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नई येथे पार पडला. या सामन्यात भारताने २८० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यातील पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या शुबमन गिलने दुसऱ्या डावात नाबाद शतकी खेळी साकारली. दुसऱ्या डावात शुबमनने बांगलादेशच्या फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी ‘फुट वर्क’चा वापर करण्याची आपली जुनी शैली अवलंबली. त्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाला शुबमन गिल?

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शुबमन गिल म्हणाला, “पूर्वी जेव्हा मी सराव करायचो, तेव्हा खासकरून फिरकीपटूंविरुद्ध मी पायाचा वापर करुन पुढे जाऊन खेळायचो. मी येथेही तीच रणनीती अवलंबली. कारण चेंडू क्वचितच वळत असल्यामुळे अशा विकेटवर फिरकीपटूला लय शोधणे सोपे नव्हते. त्यामुळे बांगलादेशी फिरकीपटूंविरुद्ध मुक्तपणे फटकेबाजी करु शकलो.” गिलने ऑफ-स्पिनर मेहदी हसन मिराझच्या विरोधात ही रणनीती अवलंबली, जेव्हा त्याने पुढे जाऊन षटकार मारला. यानंतर त्याने शाकिब अल हसनविरुद्धही असेच केले.

‘लहान असल्यापासून याचा सराव करतोय’ –

शुबमन म्हणाला की, तो या खेळात नवखा असल्यापासूनच फिरकीपटूंविरुद्ध पुढे जाऊन खेळण्याचा सराव करत असे आणि जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसतसे तो आपली कौशल्य सुधारत गेला. तो म्हणाला, “मी अगदी लहान असल्यापासून याचा सराव करतोय. मी उंच आहे आणि त्यामुळे पायाचा वापर करुन पुढे जाऊन फटकेबाजी करणे माझ्यासाठी सोपे आहे. पूर्वी मला लाँग शॉट्स मारता येत नव्हते, पण कालांतराने मी ते मारायला शिकलो.”

हेही वाचा – IND vs BAN : शकीब अल हसन फलंदाजी करताना काळा धागा का चघळतो? दिनेश कार्तिकने सांगितले कारण

धावा केल्याने खूप समाधान मिळाले – शुबमन गिल

भारताच्या युवा खेळाडून पुढे म्हणाला की, “कोणत्याही विरोधी संघाविरुद्ध निश्चितपणे धावा केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि मी आता त्यावर काम करत आहे. त्यामुळे येथे धावा केल्याने खूप समाधान मिळाले. या मालिकेपूर्वी मी खूप सराव केला होता. माझा विश्वास आहे की इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. येथे पहिल्या डावात लवकर बाद होणे खूपच निराशाजनक होते. पण दुसऱ्या डावात मला पुरेसा वेळ क्रीजवर घालवता आला याचा मला आनंद आहे.”

हेही वाचा – IND vs BAN : अश्विन अण्णाची फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल, अनिल कुंबळेचा विक्रम मोडत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

शुबमन गिलकडून ऋषभ पंचतचे कौतुक –

शुबमन गिलने २०२२ मध्ये कार अपघातानंतर पहिला कसोटी सामना खेळताना शतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतचे कौतुक केलेतो म्हणाला, “मैदानावर आणि मैदानाबाहेर मी त्याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. त्यामुळे पुनरागमन करताना त्याने झळकावलेल्या शतकाचा मला खूप आनंद आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने किती मेहनत घेतली, हे मी पाहिले आहे आणि मला खात्री आहे की त्याचाही आत्मविश्वास वाढला असणार आहे.”