भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर संमिश्र कामगिरी करताना दिसत आहे. या दौऱ्यात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताला १-२ ने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर भारत विरुद्ध बांगलादेश संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सध्या खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा स्टार युवा फलंदाज शुबमन गिल याने शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील पहिलेच शतक होते. भारत-बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमानांना फॉलो-ऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेत विजयासाठी बांगलादेशसमोर ५१३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डावात ४०४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ १५० धावांवर गारद झाला. भारताने २५८ धावांवर दुसरा डाव घोषित केला. आता बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर भारताला विजयासाठी १० विकेट्सची गरज आहे.

चेतेश्वर पुजाराने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १९वे शतक पूर्ण केले आहे. त्याने १३० चेंडूत १०२ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या खेळीत त्याने १३ चौकार मारले. पुजाराच्या शतकासह कर्णधार राहुलने भारताचा डाव घोषित केला. दुसऱ्या डावात भारताने २ बाद २५८ धावा केल्या. आता बांगलादेशसमोर विजयासाठी ५१३ धावांचे लक्ष्य आहे. सामन्याला दोन दिवसांहून अधिक दिवसांचा खेळ शिल्लक असताना भारताला विजयासाठी १० विकेट्सची गरज आहे.

तत्पूर्वी, भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. मोहम्मद सिराजने सलामवीर नजमूल शांतोला यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. उमेश यादवने दुसरा धक्का देताना यासिर अलीचा (४) त्रिफळा उडवला. जाकीर हसन (२०) व लिटन दास (२४) यांनी बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कुलदीपने मुश्फीकर रहिम (२८), कर्णधार शाकिब अल हसन ( ३) आणि नुरूल हसन (१६) यांच्या विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज व कुलदीप यादव यांनी बांगलादेशला धक्के दिले. कुलदीपने कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

अक्षर पटेलने शेवटची विकेट घेत बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळला. २५४ धावांची आघाडी असताना भारताने फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला. कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादव अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. फॉलो ऑन न देता फलंदाजीचा सराव मिळावा या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला ( २३) पुन्हा अपयश आले. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी झटपट अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या धावसंख्येत भर घातली. गिलने २०२२ मध्ये भारताच्या सलामावीराने कसोटीत सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम केला.

हेही वाचा: IND vs BAN 1st Test: ‘शुभ’ नशीब गिल! जेव्हा DRS मशीन बंद पडते तेव्हा…बांगलादेशी खेळाडूंच्या चेहऱ्यावर वाजले तीन तेरा

शुबमनने मिळालेल्या संधीवर सोनं करताना कसोटीतील पहिले शतकही पूर्ण केले. १५२ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह गिलने ११० धावा केल्या. त्याने पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बांगलादेशविरुद्ध कसोटीत शतक झळकावणारा गिल हा सातवा भारतीय सलमीवीर ठरला. यापूर्वी गौतम गंभीर, वासिम जाफर, दिनेश कार्तिक, शिखर धवन, मुरली विजय, मयांक अग्रवाल यांनी हा पराक्रम केला आहे. पुजारानेही धावांची गती वाढवली आणि कसोटीतील त्याचे सर्वात जलद शतक झळकावले. तब्बल ३ वर्ष व ३४७ दिवसांनंतर पुजाराने कसोटीत शतक पूर्ण केले. ५२ इनिंग्जनंतर केलेली ही खेळी त्याची कसोटीतील सर्वात जलद शतकी खेळी ठरली. त्याचे हे १९वे शतक ठरले आणि भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित करताना बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 1st test shubman pujaras brilliant centuries india declared the innings 513 runs in front of bangladesh to win avw