बांगलादेश आणि भारत यांच्या दरम्यान चट्टोग्राम येथे सुरू असलेल्या पहिला कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. पहिल्या दिवशी श्रेयस अय्यर व चेतेश्वर पुजारा यांनी दाखवलेल्या शानदार खेळानंतर भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी गोलंदाजांच्या बळावर सामन्यावर आपली पकड मजबूत केली. संघात पुनरा आगमन करत असलेल्या कुलदीप यादव याने चार बळी घेत भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि बांगलादेश यांच्यातील चट्टोग्राम कसोटी सामन्यादरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज त्याच्या ओळखीच्या शैलीत दिसला. डेल स्टेन किंवा शोएब अख्तरप्रमाणेच आक्रमकता दाखवत मोहम्मद सिराजही विरोधी संघाच्या फलंदाजांवर चांगलाच तुटून पडताना दिसला. धारदार गोलंदाजी करत मोहम्मद सिराजने बांगलादेशी फलंदाजांना स्लेजिंग करण्याची कोणतीही कसर सोडली नाही आणि एकामागून एक तो विकेट्स घेत गेला. खेळपट्टीवर स्थिरावलेला फलंदाज लिटन दासलाही सिराजच्या रोषाचा सामना करावा लागला.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला लिटन दास २४ धावा करून सेट झाला होता. लिटन दास मोठी इनिंग खेळण्याच्या मूडमध्ये होता पण इथे मोहम्मद सिराजने त्याला डिवचले. १४व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आक्रमक सिराज फलंदाज लिटन दासकडे गेला आणि त्याला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान लिटन दासही सिराजच्या कानावर हात ठेवून उत्तर देतो.

सिराजने लिटन दासला त्रिफळाचीत करून घेतला बदला

जणू काही लिटन दास सिराजला मोठ्याने बोलण्यास सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तू काय बोलत आहेस ते मला ऐकू येत नाही. यानंतर सिराज बॉलिंग एंडला गेला आणि पुढच्याच चेंडूवर लिटन दासला त्रिफळाचीत केले. लिटन दासला बाद केल्यानंतर सिराजसोबत विराट कोहलीही बॅट्समनची खिल्ली उडवताना दिसला. सर्वप्रथम लिटन दासप्रमाणे विराट कोहलीही कानावर हात ठेवतो, ज्याला पाहून मोहम्मद सिराजही कानावर हात ठेवून लिटन दासची खिल्ली उडवताना दिसत आहे. मात्र, सिराजसोबतचा पंगा लिटन दासला महागात पडला आणि त्याला आपली विकेट गमवावी लागली.

हेही वाचा: FIFA World Cup: अर्जेंटिना की फ्रान्स? कोण ठरणार ३५० कोटींचा मालक, गोल्डन बूटचा मानकरीही होणार मालामाल

भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करत असलेल्या मोहम्मद सिराजने उमेश यादवसह आग ओकणारी गोलंदाजी केली.  सिराजने तीन फलंदाजांना बाद केले. तर, प्रदीर्घ काळानंतर कसोटी संघात जागा मिळवलेल्या फिरकीपटू कुलदीप यादव याने चार बळी मिळवत बांगलादेशचा डाव रोखला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस बांगलादेशने ८ बाद १३३ अशी मजल मारली होती. भारतीय संघाकडे अद्याप २७१ धावांची आघाडी असून, बांगलादेशला लवकरात लवकर सर्वबाद करण्याचा प्रयत्न भारतीय गोलंदाज करतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 1st test this is how siraj took revenge for liton dass sledging virat kohlis reaction also went viral avw