IND vs BAN 2nd Test Akash Deep smashes 2 Sixes to Shakib Al Hasan video viral : कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. बांगलादेशच्या २३३ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीम इंडियाने केवळ ३४.४ षटके खेळली. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल ते केएल राहुल, विराट कोहली, शुबमन गिल यांनी टीम इंडियासाठी तुफानी फलंदाजी केली. मात्र, या फलंदाजीशिवाय, वेगवान गोलंदाज आकाश दीपने केलेल्या फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने खेळपट्टीवर येताच पहिल्या तीन चेंडूंमध्ये २ षटकारही ठोकले. त्याच्या या षटकारानंतर विराट-रोहित चकित झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आकाश दीपची विराटच्या बॅटने फटकेबाजी –
अलीकडेच विराट कोहलीने आकाश दीपला आपली बॅट भेट दिली होती. आकाश दीपने विराटची बॅट भेट म्हणून मिळाल्यानंतर दमदार फलंदाजी केली. त्याने शकीब अल हसनच्या दोन चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकले. आकाश दीपची ही फटकेबाजी पाहून विराट कोहलीच्या आनंदाला पारावार उरला नाही. पॅव्हेलियनमध्ये तो या दृश्याचा आनंद घेताना दिसला. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर या दोन शॉट्सचे रिप्ले पुन्हा पुन्हा पाहताना दिसले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कानपूर कसोटीत टीम इंडियाने ओतला जीव –
सामन्याबद्दल बोलायचे, तर टीम इंडियाने या सामन्यात आक्रमक फलंदाजी करत रोमांच निर्माण केला. पहिल्या तीन दिवसांच्या खेळावर पावसाचा परिणाम झाला, पण चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या गोलंदाजांनी प्रथम बांगलादेशला २३३ धावांवर रोखले आणि त्यानंतर टीम इंडियाने टी-२० क्रिकेटच्या शैलीत फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारून सामन्याचा वेग वाढवला आणि यशस्वी जैस्वालने तो पुढे नेला. रोहितने ११ चेंडूत २३ धावा केल्या तर जैस्वालने ५१ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. शुबमन गिलने ३९ धावा केल्या. विराट कोहलीने ४७ आणि राहुलने ६८ धावांचे योगदान दिले. या सर्व फलंदाजांचा स्ट्राईक रेट १०० पेक्षा जास्त होता.
हेही वाचा – IND vs BAN : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत केला नवा विश्वविक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
विराट कोहलीचे हुकले अर्धशतक –
विराट कोहलीने आपल्या २७ हजार धावा नक्कीच पूर्ण केल्या. पण त्याला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. बांगलादेशविरुद्ध कानपूरमध्ये कोहलीने ३५ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने चार चौकार आणि एक गगनभेदी षटकार लगावला. भारत विरुद्ध बांगलादेश सामना आता त्याच्या निर्णायक टप्प्यात आहे. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटही टी-२० क्रिकेटच्या शैलीत खेळले जात आहे. भारतीय संघाने आपला पहिला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला. ज्यामुळे भारताला पहिला डावाच्या जोरावर ५२ धावांची आघाडी मिळाली.