बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. गुरूवारपासून (२२ डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. यावर्षाचा शेवट गोड करण्यासाठी भारत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न नक्की करणार. यजमानांनी दुसऱ्या डावात २३१ धावा केल्या. लिटन दास आणि झाकीर हसन यांनी शानदार अर्धशतके झळकावली. दोलायमान होत असलेल्या या दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेले. मात्र तरी या धावा करणे फारसे सोपे नाही. कारण खेळपट्टी फारशी फलंदाजीला अनुकूल राहिली नाही आहे.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच मोहम्मद सिराज आणि आर अश्विन यांनी बांगलादेशला लागोपाठ दोन धक्के दिले आहेत. ढाकामध्ये सुरू असलेल्या या सामन्याचे पारडे कधी बांगलादेश तर कधी भारताकडे झुकताना दिसत आहे. भारताने पहिल्या डावात ३१४ धावसंख्या उभारत ८७ धावांची आघाडी घेतली होती. बांगलादेशने दुसऱ्या डावात २३१ एवढी धावसंख्या केली. भारताने घेतलेली ८७ आघाडी मागे टाकत भारतावर १४४ धावांची आघाडी गेतली.
दरम्यान, झाकीर हसन आणि लिटन दास यांनी झुंजार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न उमेश यादवने झाकीरला ५१ धावांवर बाद करत जोडी फोडली. त्यानंतर अक्षरने मेहदी हसन मिराजला शुन्यावर बाद करत बांगलादेशला ११३ धावांवर सहावा धक्का दिला. यानंतर लिटन दास आणि नुरूल हसनने भागीदारी रचत भारताला दुसऱ्या डावात आव्हानात्मक धावसंख्या देण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलने नुरूल हसनला ३१ धावांवर बाद करत सातव्या विकेटसाठीची ही ४६ धावांची भागीदारी तोडली.
चहापानापर्यंत लिटन दासने अर्धशतकी खेळी करत बांगलादेशला १९५ धावांपर्यंत पोहचवले.चहापानानंतर लिटन दास आणि टस्किन अहमदने आठव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचत बांगलादेशला २०० च्या पार पोहचवले. मात्र अखेर मोहम्मद सिराजने लिटन दासला ७३ धावांवर बाद केले. दास बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव लगेच संपेल असे वाटले होते. मात्र तस्कीन अहमदने फटकेबाजी करत बांगलादेशला २३१ धावांपर्यंत पोहचवले. अखेर खलील अहमद ४ धावांवर धावबाद झाला अन् बांगलादेशचा डाव २३१ धावांवर संपला. तस्कीन अहमदने नाबाद ३१ धावा केल्या. तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात २२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ३१४ धावा केल्या.
बांगलादेशने ठेवलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कर्णधार केएल राहुल भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. यष्टिचीत होत पुजाराच्या रूपाने टीम इंडियाला मोठा धक्का बसला त्याने केवळ ६ धावा केल्या. सध्या भारताची धावसंख्या १२/२ अशी आहे. आजच्या दिवसाच्या खेळात अजूनही १५ षटके टाकणे बाकी आहे. त्यामुळे भारताला मोठ्या भागीदारीची गरज आहे. जर ५० ते ७० धावांची भागीदारी झाली तर टीम इंडियाचा विजय निश्चित!