India breaks record for fastest team fifty and hundred in Test cricket : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ग्रीन पार्क, कानपूर येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० धावा करत भारतासाठी विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. यंदा ट्रेंट ब्रिजवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने अवघ्या ४.२ षटकांत ५० धावांचा टप्पा गाठला होता. आता रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी अवघ्या ३ षटकांत ५० धावांचा टप्पा पार करत विश्वविक्रम मोडला. यानंतर टीम इंडियाने जलद १०० धावा करण्याचा स्वत:चा विक्रमही मोडला.

भारताने स्वतःचाच विक्रम मोडला –

टीम इंडियाने कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी इतिहास घडवला. सर्वात जलद १०० धावा करण्याचा विक्रम केला. अवघ्या १०.१ षटकात १०३ धावा करत भारताने आपलाच विक्रम मोडला आहे. यापूर्वी भारताने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० धावा करण्याचा पराक्रम केला होता. भारताने २०२३ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत सर्वात जलद १०० धावा केल्या होत्या. त्यावेळी भारताने १२.२ षटकात १०० धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने श्रीलंकेचा विक्रम मोडला. श्रीलंकेने २००१ साली बांगलादेशविरुद्ध १३.१ षटकात सर्वात जलद १०० धावा करण्याचा पराक्रम केला होता.

रोहित शर्माने षटकाराने केली डावाची सुरुवात –

रोहित शर्माने या सामन्यात दोन षटकारांसह आपल्या डावाची सुरुवात केली आहे. या सामन्यात रोहित शर्मा चांगलाच फॉर्मात होता. तो ड्रेसिंग रुममधून सेटवर होऊन आल्यासारखा वाटत होता. मात्र, वेगवान धावा करण्याच्या नादात तो बाद झाला. या सामन्यात रोहित शर्माने केवळ ११ चेंडूत २३ धावांची खेळी केली. ज्यामध्ये तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. रोहित शर्माला मेहदी हसन मिराजने बाद केले.

हेही वाचा – IND vs BAN : कानपूरमध्ये मेहदी हसन मिराजवर गांधीलमाशीचा हल्ला, पॅड असूनही गुडघ्याला चावली

टीम इंडियाने वेगवान फलंदाजी का केली?

या सामन्यात टीम इंडिया खूप वेगवान फलंदाजी करत आहे. वास्तविक, या कसोटी सामन्याचा दुसरा आणि तिसरा दिवस पाऊस आणि ओल्या मैदानामुळे रद्द करण्यात आला होता. पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकेच खेळता आली. त्यामुळे टीम इंडियाला खेळाच्या चौथ्या दिवशी वेगवान फलंदाजी करावी लागत आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला अवघ्या २३३ धावांवर गुंडाळले. सध्या या सामन्यात भारताकडे जास्त वेळ नाही. त्यामुळे या सामन्याचा निकाल सामन्याच्या पाचव्या दिवशी अनिर्णित होऊ नये, यासाठी टीम इंडिय वेगाने धावा करत आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.