भारतीय जलदगती गोलंदाजांच्या त्रिकुटाने कोलकाता कसोटी सामन्यात पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी केली आहे. आपला पहिला आंतरराष्ट्रीय दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर गारद केला. इशांत शर्माने पहिल्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला आहे. त्याला उमेश यादवने ३ तर मोहम्मद शमीने दोन बळी घेत चांगली साथ दिली.

तब्बल १२ वर्षांच्या कालावधीनंतर इशांत शर्माने भारतीय मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये ५ बळी घेण्याची कामगिरी केली आहे. याआधी २००७ साली पाकिस्तानविरुद्ध बंगळुरु कसोटी सामन्यात इशांतने अशी कामगिरी केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे इशांत शर्मा २००७ साली आपल्या कसोटी कारकिर्दीतली दुसरी कसोटी खेळत होता, आणि त्यावेळी तो अवघ्या १९ वर्षांचा होता.

आपला पहिला-वहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. केवळ ३८ धावांत बांगलादेशचा निम्मा संघ माघारी परतला. बांगलादेशचा तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज शून्यावर माघारी परतला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरचा फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही पाचवी वेळ ठरली आहे. याआधी २००५ साली झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात असा प्रसंग घडला होता. यानंतर तब्बल १४ वर्षांनी भारतीय गोलंदाजांनी या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, तब्बल १४ वर्षांनी विक्रमी कामगिरीची नोंद