इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव या त्रिुकटाने कोलकाता कसोटी सामन्यातही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. आपला पहिला-वहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. केवळ ३८ धावांत बांगलादेशचा निम्मा संघ माघारी परतला. बांगलादेशचा तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज शून्यावर माघारी परतला.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरचा फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही पाचवी वेळ ठरली आहे. याआधी २००५ साली झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात असा प्रसंग घडला होता. यानंतर तब्बल १४ वर्षांनी भारतीय गोलंदाजांनी या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.
तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज शून्यावर बाद होण्याचे प्रसंग –
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – लिड्स कसोटी (१८९९)
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड – द ओव्हल कसोटी (१९५५)
- वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड – किंग्जस्टन कसोटी (२००४)
- झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड – हरारे कसोटी (२००५)
- भारत विरुद्ध बांगलादेश – कोलकाता कसोटी (२०१९)*
बांगलादेशच्या आघाडीच्या फळीतले ३ फलंदाज हे भोपळाही न फोडता माघारी परतले. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रावर आपलं वर्चस्व गाजवत बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं.
अवश्य वाचा – IND vs BAN : घरच्या मैदानावर साहाची विक्रमी कामगिरी, धोनीशी केली बरोबरी