बांगलादेशविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने बाजी मारल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने विजय मिळवला आहे. इंदूर कसोटी सामन्यात डावाने बाजी मारल्यानंतर ऐतिहासिक कोलकाता कसोटी सामन्यातही भारताने १ डाव आणि ४६ धावांनी बाजी मारत मालिकेत २-० ने निर्भेळ यश संपादन केलं. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हा सलग सातवा विजय ठरला आहे. याचसोबत कसोटीत सलग ४ सामने डावाने जिंकण्याचा मानही भारतीय संघाला मिळाला आहे.

याआधी २०१३ साली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सलग ६ विजयांची नोंद केली होती. २०१९ वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा कसोटी सामना होता. यानंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकेला सामोरं जावं लागणार आहे.

दरम्यान, आपला पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपवला. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. उमेश यादवने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला तर त्याला इशांत शर्माने ४ बळी घेत चांगली साथ दिली. बांगलादेशचा एक फलंदाज जखमी झाल्यामुळे खेळू शकला नाही. मुश्फिकुर रहिमने मैदानात थोडावेळ तग धरत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज झटपट माघारी परतले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

अवश्य वाचा – IND vs BAN : गुलाबी कसोटीत ‘विराट’सेनेची ऐतिहासिक कामगिरी