बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. गुरूवारपासून (२२ डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच मोहम्मद सिराज आणि आर अश्विन यांनी बांगलादेशला लागोपाठ दोन धक्के दिले आहेत. ढाकामध्ये सुरू असलेल्या या सामन्याचे पारडे कधी बांगलादेश तर कधी भारताकडे झुकताना दिसत आहे. भारताने पहिल्या डावात ३१४ धावसंख्या उभारत ८७ धावांची आघाडी घेतली होती.
सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटच्या मैदानावर शांत ठेवणे खूप कठीण आहे. फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, प्रत्येक क्षेत्रात त्याची आगळीक वेगळी असते. असाच काहीसा प्रकार बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने नजमुल हसन शांतोची शाळा घेताना दिसला. कोहलीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो शांतोवर चिडताना दिसत आहे.
खरे तर दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात बांगलादेशचा संघ फलंदाजीला आला. दरम्यान, नॉन स्ट्राइक टोकाला उभा असलेला शांतो त्याच्या बुटाच्या लेस बांधत होता. काही खेळाडू या डगआऊटमधून ड्रिंक्स घेऊन पोहोचले. सहा षटके संपली होती आणि मैदानातील लाईट्स थोड्या खराब होत्या त्यामुळे प्रकाश मंद होत होता. त्यामुळे खेळाला उशीर होऊ नये आणि लवकरात लवकर षटक पूर्ण व्हावेत, अशी कोहलीची इच्छा होती. पण शांतो वेळकाढूपणा करत होता. यावेळी कोहली शांतोला “तुझा शर्ट पण काढून घे” असे म्हणत त्याच्यावर भडकला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो शर्ट उघडण्यासाठी इशारा करत असल्याचे दिसत आहे.
भारत वि. बांगलादेश दुसरी कसोटी ही रंगतदार स्थितीत आहे. सध्या बांगलादेशचा दुसरा डाव सुरु असून १०१/५ अशी धावसंख्या आहे. भारताने घेतलेली ८७ आघाडी मागे टाकत भारतावर लीड चढवण्यास सुरुवात केली आहे. सलामीवीर झाकीर हसनने शानदार अर्धशतक केले. ५१ धावांवर बाद झाला. बाकी कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. उमेश यादवने दोन गडी तर जयदेव उनाडकट याने एक गडी बाद केला.