बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून (२२ डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. मीरपूर कसोटीत टीम इंडिया संकटात सापडली आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्यांचा पूर्णपणे बरोबर असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे, कारण भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना सध्या ४५ धावांवर ४ गडी बाद अशा नाजूक अवस्थेत आहे. यजमानांचा पहिलाच डाव २२७ धावसंख्येवर उरकला. दुसऱ्या डावातही त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. संपूर्ण संघ अवघ्या २३१ धावांवर गारद झाला. यामुळे भारतासमोर आता विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य आहे.
मीरपूर येथील बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी सध्या दोलायमान अवस्थेत आहे. बांगलादेशने दिलेल्या १४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सलामीवीर कर्णधार लोकेश राहुल (२), चेतेश्वर पुजारा (६), शुबमन गिल (७) आणि विराट कोहली (१) हे झटपट बाद झाल्याने टीम इंडिया अत्यंत नाजूक स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ४ बाद ४५ धावांपर्यंत मजल मारली आहे.
झुंजार बांगलादेशसमोर बलाढ्य भारतीय संघ अक्षरशः धापा टाकताना दिसतो आहे असे म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. अक्षर पटेल (२६) आणि जयदेव उनाडकट (३) खेळपट्टीवर आहेत. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी १०० धावांची गरज असून, भारताच्या हातात ६ विकेट्स आहेत. भारताला मोठ्या भागीदारीची गरज आहे. जर ५० ते ७० धावांची भागीदारी झाली तर टीम इंडियाचा विजय निश्चित!
तत्पूर्वी, दरम्यान, झाकीर हसन आणि लिटन दास यांनी झुंजार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न उमेश यादवने झाकीरला ५१ धावांवर बाद करत जोडी फोडली. त्यानंतर अक्षरने मेहदी हसन मिराजला शुन्यावर बाद करत बांगलादेशला ११३ धावांवर सहावा धक्का दिला. यानंतर लिटन दास आणि नुरूल हसनने भागीदारी रचत भारताला दुसऱ्या डावात आव्हानात्मक धावसंख्या देण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलने नुरूल हसनला ३१ धावांवर बाद करत सातव्या विकेटसाठीची ही ४६ धावांची भागीदारी तोडली.
चहापानापर्यंत लिटन दासने अर्धशतकी खेळी करत बांगलादेशला १९५ धावांपर्यंत पोहचवले.चहापानानंतर लिटन दास आणि टस्किन अहमदने आठव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचत बांगलादेशला २०० च्या पार पोहचवले. मात्र अखेर मोहम्मद सिराजने लिटन दासला ७३ धावांवर बाद केले. दास बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव लगेच संपेल असे वाटले होते. मात्र तस्कीन अहमदने फटकेबाजी करत बांगलादेशला २३१ धावांपर्यंत पोहचवले. अखेर खलील अहमद ४ धावांवर धावबाद झाला अन् बांगलादेशचा डाव २३१ धावांवर संपला. तस्कीन अहमदने नाबाद ३१ धावा केल्या. तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात २२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ३१४ धावा केल्या.