इशान किशनने शनिवारी आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. २४ वर्षीय युवा यष्टिरक्षक फलंदाजाला पहिल्यांदाच बांगलादेश दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली. त्याने संधीचा पुरेपूर फायदा घेत ८५ चेंडूत शतक झळकावले. तो अजूनही क्रीजवर उभा आहे. ३ सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 0-2 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाखाली संघाला हा सामना जिंकून क्लीन स्वीप टाळायचा आहे.
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. शिखर धवनला केवळ ३ धावा करता आल्या. तिन्ही सामन्यांत त्याला २० धावाही करता आल्या नाहीत. यानंतर इशान आणि कोहलीने शतकी भागीदारी करत संघाला सावरले आहे.
नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघाला पहिला झटका १५ धावसंख्येवर बसला. ऑफस्पिनर मेहदी हसनने शिखर धवनला पायचित केले. त्याने ८ चेंडूत ३ धावा केल्या. पहिल्या सामन्यात त्याला ७ धावा तर दुसऱ्या वनडेत ८ धावा करता आल्या. अशाप्रकारे, त्याने वनडे मालिकेतील ३ सामन्यात ६ च्या सरासरीने केवळ १८ धावा केल्या आहेत. वृत्त लिहिपर्यंत भारताने ३१ षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात २५७ धावा केल्या होत्या. इशान १८४ आणि कोहली ६४ धावांवर खेळत आहेत.
प्रत्येक दुसऱ्या डावात ५० पेक्षा जास्त धावा –
इशान किशनची एकदिवसीय सामन्यातील ही ९वी खेळी आहे. त्याने आतापर्यंत ३ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. म्हणजेच तो प्रत्येक दुसऱ्या डावात ५० हून अधिक धावांची इनिंग खेळत आहेत. या सामन्यापूर्वी ईशानने एकदिवसीय सामन्यांच्या ८ डावात ३३ च्या सरासरीने २६७ धावा केल्या होत्या. ९३ धावा ही सर्वोत्तम खेळी ठरली होती. स्ट्राइक रेट ९१ होता, जो चांगला आहे. त्याने २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५८९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ४ अर्धशतके झळकावली आहेत.