भारत आणि बांगलादेश संघात तिसरा वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून इशान किशनने आणि विराट कोहलीने शानदार खेळी साकारली. इशान किशनने द्विशतक आणि विराटने शतक झळकावले. त्यामुळे भारतीय संघाने ८ बाद ४०९ धावा केल्या. त्याचबरोबर बांगलादेश संघाला विजयसाठी ४१० धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान इशान किशनने एका पायावर उभा राहून नटराज शॉट खेळल्याचा व्हिडिओ, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इशान किशनने खेळला नटराज शॉट –
दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या, इशान किशनने पहिल्याच सामन्यात आपले कौशल्य दाखवून दिले. त्याने सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर वर्चस्व राखले आणि अनेक शानदार फटके खेळले. इशानने १३१ चेंडूत २१० धावा केल्या. त्याने २२ व्या षटकात एक शानदार चौकार लगावला. त्याने हा चौकार एका पायावर उभा राहून नटराज शॉट खेळला. हे पाहून समोर उभा असलेला विराट कोहलीही हैराण झाला.
इशान किशनने शानदार फटकेबाजी करत कारकीर्दतील पहिले द्विशतक झळकावले. सगळ्यात कमी चेंडूत द्विशतक करत त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. ख्रिस गेलने १३८ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले होते व तो १४७ चेंडूत २१५ धावा करून बाद झाला होता. मात्र इशान किशनने केवळ १२६ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले आणि १३१ चेंडूत २१० धावा करून बाद झाला. त्याचबरोबर तो भारताकडून द्विशतक लगावणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
भारताकडून द्विशतक झळकवलेले खेळाडू –
सचिन तेंडूलकर – २००
वीरेंद्र सेहवाग – २१९
रोहित शर्मा – २६४, २०९ आणि २०८
इशान किशन- २१०
त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढत १३१ चेंडूवर २४ चौकार व १० षटकारांच्या मदतीने २१० धावा पूर्ण केल्या आणि तो बाद झाला. सामन्यात द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरले.