शनिवारी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने २२७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून इशान किशनने द्विशतक झळकावून मोलाचे योगदान दिले. त्याने विक्रमी २१० धावांची खेळी केली. त्यानंतर इशान किशनने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खडतर स्पर्धेची कबुली दिली आहे. तसेच त्याने सांगितले की, मर्यादित संधींचा फायदा घेण्याची गरज त्याला चांगलीच ठाऊक आहे.

जखमी रोहित शर्माच्या जागी संघात आलेल्या इशान किशनने, वनडे इतिहासातील सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. भारतीय संघ जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळेल तेव्हा परिस्थिती बदलू शकते. कारण रोहित तंदुरुस्त असेल आणि शिखर धवन देखील संघाचा भाग असेल. याशिवाय शुबमन गिलनेही मर्यादित प्रसंगी एकदिवसीय संघात स्वत:ला सिद्ध केले आहे.

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत इशान किशन म्हणाला, “मला नाही वाटत की या संघात फलंदाजीचा क्रम निश्चित आहे. अनेक मोठे खेळाडू वेगवेगळ्या क्रमांकावर खेळत आहेत. हे कामगिरीबद्दल आहे. मला या स्थानावर फलंदाजी करायची आहे, अशी मी तक्रार करू शकत नाही.”

किशनने आक्रमक शैलीत फलंदाजी करताना ४९ चेंडूंत अर्धशतक, ८५ चेंडूंत शतक पूर्ण केले. मग त्याने धावांची गती अधिकच वाढवली. त्याने पुढील १०० धावा केवळ ४१ चेंडूंत केल्या. इशान किशन २१० धावांवर असताना झेलबाद झाला. त्याने १३१ चेंडूचा सामना करताना २४ चौकार आणि १० षटकार लगावले.

हेही वाचा – IND vs BAN 3rd ODI: इशान किशनने बांगला टायगर्सची केली शिकार! भारताचा बांगलादेशवर २२७ धावांनी विजय, मात्र मालिका २-१ ने गमावली

इशान किशनसाठी प्रत्येक सामन्यातील संधीचा फायदा घेणे महत्त्वाचे आहे. किशन पुढे म्हणाला, “ही एक अशी संधी आहे, जेव्हा तुम्हाला मोठी धावसंख्या करायची असते. कारण तुमची क्षमता दाखवण्यासाठी तुम्हाला फक्त एक किंवा दोन सामने मिळतील. यातूनच एखादा मोठा खेळाडू बाहेर येतो, आलेल्या संधीचे सोने करतो.” इशानला जानेवारीत होणाऱ्या भारताच्या पुढील वनडेत संधी मिळेल की नाही याची चिंता नाही.

तो पुढे म्हणाला, “मी पुढचा सामना खेळणार की नाही याचा विचार करत नाही. संधी मिळेल तेव्हा माझे सर्वोत्तम देणे हे माझे काम आहे. मी जास्त बोलत नाही, मला माझ्या बॅटने बोलायला हवे आहे.” भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड देखील इशानच्या कामगिरीवर खूश होते. डावानंतर प्रशिक्षकाने त्याला मिठी मारली. किशन म्हणाला,” ते (द्रविड) खूप आनंदी होते. कारण त्यांना माहित आहे की खेळाडूला फक्त एक संधी हवी असते.”