भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शनिवारी बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून एक विशेष कामगिरी केली आहे. कोहलीने ऑगस्ट २०१९ नंतर पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि एका महान फलंदाजाचा विक्रम मोडला. कोहलीच्या कारकिर्दीतील हे ७२ वे शतक आहे. यासह तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विराटचे वनडेतील हे ४४ वे शतक आहे.
कोहलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर ७१ शतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे सोडले. तसे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम महान सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावली आहेत. कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ ८५ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले. इबादत हुसेनने टाकलेल्या ३९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कोहलीने फाइन लेगच्या दिशेने षटकार मारून शतक पूर्ण केले.
द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनसोबत कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी २९० धावांची भागीदारी केली. कोहलीने इशान किशनला मोकळेपणाने त्याचे शॉट्स खेळू दिले. कोहलीने एका टोकाला उभा राहून बांगलादेशी गोलंदाजांना वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. विराट कोहलीने नुकतेच आशिया चषक स्पर्धेत शतक झळकावून फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दिले होत. आता तो एकदिवसीय क्रिकेटमधील शतकाचा दुष्काळ संपवण्यात यशस्वी झाला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज –
१०० – सचिन तेंडुलकर (भारत)
७२ – विराट कोहली (भारत)
७१ – रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
६३ – कुमार संगकारा (श्रीलंका)
६२ – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
पहिल्यांदा इशान किशनने द्विशतक झळकावून चाहत्यांची मने जिंकली. इशान किशन एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत द्विशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने केवळ १२६ चेंडूत २३ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. किशनने ख्रिस गेल आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गजांना मागे सोडले.