Abhishek Sharma run out video viral in IND vs BAN 1st T20 match : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारी ग्वाल्हेर येथे सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ७ विकेट्सनी दारुण पराभव केला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना १२८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने ११.५ षटकांत ३ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दरम्यान सामन्यात अभिषेक शर्मा ज्या प्रकारे रनआऊट झाला, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या रनआऊटमध्ये चूक कोणाची होती? यावर चर्चा सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रनआऊटमध्ये नक्की चूक कोणाची?

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार सूर्यकुमार यादवचा हा निर्णय अगदी योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशी संघाला केवळ १२७ धावांवर रोखले. यानंतर टीम इंडियासाठी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेले सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांनी वेगवान सुरुवात करुन दिली. मात्र, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेक शर्मा आणि संजू यांच्यात ताळमेळचा अभाव दिसून आला, ज्यामुळे अभिषेक शर्मा रनआऊट झाला.

एक धाव घेण्याच्या प्रयत्नात अभिषेक शर्मा रनआऊट झाला. या रनआऊट मुळे अभिषेकचे मन दुखावले गेले. अभिषेक शर्मा त्याच्या सर्वोत्तम लयीत दिसत होता. त्याने ७ चेंडूंचा सामना करत २ चौकार आणि १ षटकारासह १६ धावा केल्या, मात्र रनआऊट झाल्यामुळे तो मोठी खेळी खेळू शकला नाही. या रनआऊटसाठी काही चाहते अभिषेक शर्माला, तर काही चाहते संजू सॅमसनला जबाबदार धरत आहेत. नक्की चूक कोणाची होती, हे खाली दिलेल्या व्हिडीओत पाहून जाणून घ्या.

अभिषेक शर्माच्या रनआऊटचा व्हिडीओ –

हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्याच्या No Look शॉटने चाहत्यांना लावलं वेड, VIDEO होतोय तुफान व्हायरल

अभिषेक शर्मा रनआऊट झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला. अभिषेकच्या विकेटनंतर कर्णधार सूर्याने धावगती कमी होऊ दिली नाही आणि वेगाने धावा केल्या. यावेळी संजू सॅमसननेही दमदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मोठी खेळी साकारण्यात यशस्वी होऊ शकला नाही. संजू सॅमसनने १९ चेंडूत २९ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने एकूण ६ चौकारही मारले.

हेही वाचा – Sanath Jayasuriya : श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! जगातील सर्वात स्फोटक फलंदाजाला मुख्य प्रशिक्षक म्हणून केले नियुक्त

याशिवाय सूर्यकुमार यादवने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या १४ चेंडूत २९ धावा केल्या. सूर्यकुमार यादवनेही आपल्या खेळीत दोन चौकारांसह तीन उत्कृष्ट षटकार ठोकले. यानंतर हार्दिक पंड्याने अखेरपर्यंत शानदार फलंदाजी करत टीम इंडियाला केवळ ११.५ षटकांत विजय मिळवून दिला. अशा प्रकारे टीम इंडियाने आता मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban abhishek sharma run out due to lack of coordination with sanju samson video viral in india vs bangladesh 1st t20 match vbm