भारत आणि बांगलादेश या संघात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. भारताच्या दुसऱ्या डावात बांगलादेशच्या मेहदी हसन याने आपल्या फिरकीच्या बळावर भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. मात्र, श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. त्यांची भागीदारी सामन्याची दिशा बदलवणारी ठरली. हा सामना जिंकल्यावर भारताने ही कसोटी मालिका २-०ने जिंकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव २२७ धावांत गुंडाळला. यानंतर भारताने पहिल्या डावात ३१४ धावा केल्या. यजमानांनी दुसऱ्या डावात २३१ धावा केल्याने भारतासमोर विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य होते. रविचंद्रन अश्विन (४२*) आणि श्रेयस अय्यर (२९*) यांच्या सर्वोत्तम खेळीच्या जोरावर भारताने ७ गडी गमावून लक्ष्य गाठले. अश्विनने ६२ चेंडूत नाबाद ४ चौकार आणि १ षटकार ठोकला. त्याचवेळी अक्षर पटेलने ३४ धावांचे योगदान दिले.

हेही वाचा: IND vs BAN 2nd Test: “एका क्षणासाठी श्वास रोखला गेला होता…”, कठीण विजयानंतर कर्णधार केएल राहुल व्यक्त केले मत

विराटने दिली खास भेट

सामन्यानंतर विराट कोहलीने बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजला खास भेट दिली. मेहदीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो विराटची जर्सी घेताना दिसत आहे. त्याने आपला ऑटोग्राफ केलेला टी-शर्ट मिराजला भेट दिला आहे. मीरपूर कसोटी सामन्यातील भारताच्या दुसऱ्या डावात मेहदी हसनने ५ विकेट्स घेतल्या होत्या. अश्विन आणि श्रेयस यांची भागीदारी झाली नसती तर मेहदी हसन आपल्या संघाला जिंकून देऊ शकला असता. टीम इंडियाच्या या संपूर्ण दौऱ्यात मेहदी हसन मिराज हा बांगलादेशला एक नवा हिरा मिळाला असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

ढाका येथील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराजने भारताला सर्वाधिक त्रास दिला. फलंदाजीत तो विशेष काही करू शकला नाही पण गोलंदाजीत त्याने आपली ताकद दाखवून दिली. त्याने १९षटकात ६३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यादरम्यान मेहदीने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि ऋषभ पंत या स्टार फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याने अक्षर पटेललाही शिकार बनवले. मेहदीने एकदिवसीय मालिकेतही अप्रतिम कामगिरी केली होती. त्यात त्याने एक अर्धशतक आणि एक शतक केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban after winning the test series virat kohli presented the jersey to mehdi hasan showed big heart avw