IND vs BAN 2nd Test Mehidy Hasan Miraz Stung by Wasp : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने पहिल्या डावात सर्वबाद २३३ धावा केल्या. बांगलादेशसाठी मोमिनुल हकने सर्वाधिक १०७ धावांचे योगदान दिले. दरम्यान कसोटीच्या चौथ्या दिवशी एक विचित्र घटना पाहायला मिळाली. बांगलादेशचा क्रिकेटपटू मेहदी हसन मिराजवर फलंदाजी करताना गांधीलमाशीने हल्ला केला. चौथ्या दिवशी लंच ब्रेकच्या आधी ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गांधीलमाशीने मेहदी हसन मिराजला डंक मारला –

लंच ब्रेकच्या १५ मिनिटे आधी सामना थोडावेळ थांबला होता, तेव्हा मिराजला पॅड घातलेले असतानाही त्याच्या गुडघ्याला गांधीलमाशी चावली असल्याचे दिसून आले. याबाबत कॉमेंट्री करत असलेल्या मुरली कार्तिकने ही माहिती दिली. यानंतर बांगलादेशच्या फिजिओने मेहदी हसन मिराजवर मैदानात उपचार केले. तसेच त्याचा गुडघा थंड पाण्याने धुतला. ज्यानंतर फारसा त्रास होत नसल्याने मिराजने फलंदाजी सुरूच ठेवली. चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने ६ गडी गमावून २०५ धावा केल्या होत्या. मोमिनुल हकने शानदार शतक झळकावले. त्याने १७६ चेंडूत १०२ धावा केल्या आणि मेहदी हसन मिराजने ६ धावा केल्या.

मिराजची मोमिनुलसोबत ५४ धावांची भागीदारी –

शकीब अल हसन बाद झाल्यानंतर मेहदी हसन मिराज फलंदाजीला आला होता. त्याने मोमिनुलसोबत ५४ धावांची भागीदारी केली. उपाहारानंतर तो जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. मिराजने ४२ चेंडूत २० धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा बांगलादेशची धावसंख्या ७ बाद २२४ धावा होती. यानंतर बांगलादेश संघाचा पहिला डाव काही मिनिटांतच संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सिराज, अश्विन आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच रवींद्र जडेजाने एक विकेट्स घेतली. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या ३०० विकेट्स पूर्ण केल्या.

हेही वाचा – ‘पाकिस्तान भारताकडून हरला की मॅच फिक्सिंगचे आरोप व्हायचे…’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

रवींद्र जडेजाच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण –

रवींद्र जडेजाने खलीद अहमदला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले आणि कसोटी क्रिकेटमधील ३०० वी विकेट मिळवली. या विकेटसह रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट घेणारा भारताचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये, इंग्लंडच्या इयान बोथमने ७२ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता आणि सर्वात कमी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठणारा जडेजा हा त्याच्यानंतरचा खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध सुरू असलेला दुसरा कसोटी सामना जडेजाचा या फॉरमॅटमधील ७३वा सामना आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban bangladesh cricketer mehidy hasan miraz stung by wasp on day 4 of 2nd test in kanpur vbm