बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तीन गडी राखून विजय मिळवला. या मालिकेत विराट कोहली आणि केएल राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरले.
कोहलीला चार डावात केवळ ४५ धावा करता आल्या. त्याचवेळी उपकर्णधार चेतेश्वर पुजारा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. या मालिकेत एकूण २२२ धावा करणाऱ्या पुजाराला मालिकावीराचा किताब देण्यात आला. सामना संपल्यानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पुजाराला सेलिब्रेशनबद्दल प्रश्न विचारला. कैफ म्हणाला, तुम्ही खूप साधेपणाने सेलिब्रेट करता. थोडं बॅट-वेट दाखवा, थोडं आक्रमकता दाखवा आणि त्याची व्हिज्युअल्स टीव्हीवर अनेकदा दाखवली जातात.
पुजारा थोडे काहीतरी सेलिब्रेशन कर, ट्रॉफी सोशल मीडियावर टाक
मोहम्मद कैफ म्हणाला की, “हे दृश्य बघून लोकांना किमान आठवेल की पुजाराने चांगला स्कोअर केला होता नाहीतर प्रत्येक वेळी तुझ्या स्ट्राईक रेटची फक्त चर्चा होते. तू खूप हळू खेळतो याबाबतीत बोलले जाते. भाई आता मिळालेल्या ट्रॉफी सोबत काहीतरी कर, तिला किस कर त्याचे फोटो सोशल मिडिया वर टाक. आणि लोकांना दाखवून दे मी पुनरागमन केलेल्या मालिकेत चांगला खेळलो आणि मालिकावीराचा किताब देखील जिंकला. प्लीज पुजारा ही गोष्ट नक्की सेलिब्रेट कर.”
सेलिब्रेशनपेक्षा मी माझ्या बॅटने उत्तर देतो
कैफच्या या चेष्टा-मस्करीवर पुजारा म्हणाला की, “ कैफी भाई मी मोठी धावसंख्या करतो ही गोष्ट माझ्यासाठी पुरेशी आहे. माझ्या मते माझ्यापेक्षा माझी बॅट जास्त बोलते. सेलिब्रेशन करण्यापेक्षा जास्तीत जास्त धावा करून संघासाठी काहीतरी करून दाखवणे आणि विजयात योगदान देणे मला जास्त गरजेचे वाटते. खुद्द संघाला देखील वाटते ज्या प्रकारे मी फलंदाजी करतो ते फायदेशीर ठरेल. पुढे मला अशीच मोठी धावसंख्या उभी करायची आहे जास्त सेलिब्रेशन करणे माझ्या स्वभावात बसत नाही.” खरंतर, कैफला विराट कोहलीच्या आक्रमकतेवर टोमणे मारायचे होते. सामना संपल्यानंतर कोहली अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसत होता. तर पुजारा मैदानावर आणि मैदानाबाहेर शांत असतो.