India vs Bangladesh 2nd Test Scorecard in Marathi: भारताला बांगलादेशविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी ९५ धावांची आवश्यकता आहे. भारताने बांगलादेशला दुसऱ्या डावात १४६ धावांवर सर्वबाद केले आहे. हा सामना पाहण्यासाठी ग्रीन पार्क स्टेडियममध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित होते. चौथ्या दिवशीचा राजीव शुक्ला मॅच पाहतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राजीव शुक्ला काहीतरी खाताना दिसत आहेत आणि त्यानंतर कॅमेरा आपल्याकडे आहे हे पाहताच त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आता व्हायरल झाली आहे.
राजीव शुक्ला कसोटी सामना पाहत असताना समोर असलेल्या फळांचाही आस्वाद घेत होते. जेव्हा राजीव शुक्ला यांच्याकडे कॅमेरा पोहोचला तेव्हा ते पपई खात होते, तितक्यात त्यांनी समोर पाहताच त्यांना कळलं की कॅमेरा त्यांच्याकडे आहे आणि ते टीव्हीवर दिसत आहेत. मग लगेचच ते पुन्हा खुर्चीकडे मागे गेले आणि शांत बसले. ते सामना पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी दाखवले.
त्याच दरम्यान, राजीव शुक्ला यांच्या समोरून एक मुलगा जात होता, ज्याला पाहून त्यांनी हाताने इशारा करत बाजूला होण्यास सांगितलं. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेवरून ते अजिबात खूश नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. राजीव शुक्ला यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने पसरू लागला आहे. राजीव शुक्ला भारताच्या अनेक सामन्यांना उपस्थित असतात.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्यात पावसाने खूपच गोंधळ घातला. सामन्याचे पहिले तीन दिवस पावसामुळे खेळ नीट होऊ शकला नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तर एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्यात आला. कसोटीच्या पहिल्या दिवशीही पावासमुळे सामना उशिरा सुरू झाला. खेळाच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु केवळ ३५ षटके खेळली गेली, ज्यामध्ये बांगलादेशने ३ बाद १०७ धावा केल्या.
कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा बांगलादेशचा डाव २३३ धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडियाने टी-२० स्टाईलमध्ये फलंदाजी करत ९ विकेट गमावून २८९ धावा करत डाव घोषित केला. अशाप्रकारे टीम इंडियाने खेळाच्या चौथ्या दिवशी बांगलादेशवर ५६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. अखेरच्या सत्रात फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने अवघ्या २६ धावांत २ गडी गमावले. तर पाचव्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशचा संघ १४६ धावा करत सर्वबाद झाला. आता भारताला मालिकाविजयासाठी ९४ धावांची गरज आहे.