एकदिवसीय मालिकेत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील बांगलादेशने ५ धावांनी विजय मिळवत मालिका खिशात टाकली. या सामन्यात रोहित शर्मा् बांगलादेशची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्या षटकात झेल घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. मात्र तरी तो फलंदाजीसाठी आला त्याने झुंजार अर्धशतक करत २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. मात्र त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली. त्याने तातडीने मैदान सोडलं अन् स्कॅनसाठी हॉस्पिटल गाठलं. काही वेळानंतर तो बोटाला पट्टी बांधून ड्रेसिंग रूममध्ये परतला. दरम्यान, रोहित शर्मा सामन्यात फलंदाजी करणार नाही असं वाटत असतानाच तो ९ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. परंतु तळाच्या फलंदाजांकडून फार साथ न मिळाल्याने रोहितचा संघर्ष अयशस्वी ठरला. रोहितने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, पण शेवटच्या चेंडूवरील फटका हुकला अन् ५ धावांनी बांगलादेशने हा सामना जिंकला. दरम्यान, या मालिकेत त्याच्या खेळण्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडले आहेत. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली आहे.
रोहित, कुलदीप, दीपक मुंबईला परततील
पण आता मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना १० डिसेंबर रोजी चितगाव येथे होणार आहे. याआधीही टीम इंडियासाठी ही वाईट बातमी समोर आली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ही माहिती दिली. तो म्हणाला, “नक्कीच कुलदीप, दीपक आणि रोहित पुढील सामन्यात खेळू शकणार नाहीत. कुलदीप आणि दीपक मालिकेतून बाहेर आहेत. रोहितही पुढचा सामना खेळू शकणार नाही.” प्रशिक्षक द्रविड म्हणाले, “तो मुंबईला परत जाईल, जिथे तज्ञ त्याची तपासणी करतील. त्यानंतरच तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होणार की नाही हे कळेल. मात्र हे तिघेही मालिकेतील शेवटची वनडे खेळू शकणार नाहीत हे नक्की.”
डाव्या अंगठ्यातून रक्तस्त्राव
वास्तविक, बांगलादेशच्या डावात दुसऱ्याच षटकात रोहितला ही दुखापत झाली. हे षटक वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने केले. रोहित दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता आणि षटकाच्या चौथ्या चेंडूवर अनामूल हक झेलबाद झाला, जो रोहितला पकडता आला नाही. दरम्यान, चेंडू लागल्याने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यातून रक्त येऊ लागले. दुखापतीवर, भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) ट्विट केले की बीसीसीआय वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीचे मूल्यांकन करत आहे, त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्याच वेळी, दीपक चहर यांना अंगठ्याची तक्रार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने फक्त तीन षटके टाकली. तर कुलदीप सेनला पाठीचा त्रास आहे.