India vs Bangladesh, World Cup 2023: विश्वचषकाच्या १७व्या सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करायला उतरला. टीम इंडियाला नवव्या षटकात मोठा धक्का बसला. अष्टपैलू हार्दिक पांड्याला सामन्यादरम्यान दुखापत झाली. सध्या वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीकडे लक्ष देत आहे. त्यानंतरच ती किती गंभीर आहे हे कळेल. त्याला हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी नेण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिक पांड्याला तातडीने स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. हार्दिक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सामन्यासाठी मैदानात परतणे त्याच्यासाठी खूप कठीण जाणार असल्याचे स्पष्ट झाले. पण आता त्याच्या संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, हार्दिक या सामन्यात फलंदाजी करू शकतो, परंतु त्यासाठी दोन प्रमुख अटी पूर्ण कराव्या लागतील.

‘क्रिझबझ’नुसार, हार्दिक यापुढे या सामन्यात क्षेत्ररक्षण करू शकणार नाही, पण तो फलंदाजीसाठी उतरू शकतो. मात्र, फलंदाजीसाठी हार्दिकला दोन अटी पूर्ण कराव्या लागतील. या अटींनुसार, भारतीय डावाची १२० मिनिटे पूर्ण झाल्यावर किंवा संघाच्या विकेट्स ५ पडतील तेव्हाच हार्दिक फलंदाजीला येऊ शकेल, त्याआधी भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकणार नाही.

दुखापतीनंतर बीसीसीआयकडून अपडेट देताना हार्दिकला स्कॅनसाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. गोलंदाजी करताना दुखापत झालेल्या हार्दिकला त्याच्या षटकात फक्त तीन चेंडू टाकता आले आणि तो बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या षटकातील उर्वरित तीन चेंडू टाकले. सध्या तो ड्रेसिंगरूममध्ये परतला आहे. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसारच त्याला फलंदाजी करता येऊ शकते.

हेही वाचा: IND vs BAN: पापणी लवते ना लवते तोच…; रवींद्र जडेजाने पकडला अफलातून झेल, पव्हेलियनकडे पदकासाठी केला इशारा, पाहा Video

बांगलादेशने २५६ धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने आठ गडी गमावून २५६ धावा केल्या. वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य आहे. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर तनजीद हसनने ५१ धावांची खेळी केली. अखेरीस महमुदुल्लाहने ४६ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २५० धावांच्या जवळ नेली. मुशफिकुर रहीमने ३८ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी गडी बाद करण्यात यश मिळाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban big blow to the indian team hardik pandya injured against bangladesh taken for scan avw
Show comments