Aakash Chopra on Team India: आज आशिया चषक २०२३चा शेवटचा सुपर फोर सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. १७ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने विराट कोहलीला सामन्यातून वगळावे की नाही यावर आश्चर्यचकीत करणारे विधान केले.
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने सध्या सुरू असलेल्या आशिया चषक २०२३मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याबाबत मत व्यक्त केले आहे. “श्रेयस अय्यर जर फिट असेल आणि या सामन्यासाठी तयार असेल तर भारताने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा विचार केला पाहिजे,” असे चोप्रा यांचे मत आहे. पाठीच्या दुखण्यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीला पाकिस्तानविरुद्ध खेळल्यानंतर अय्यरला संघातून बाहेर काढण्यात आले. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला.
आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “मला वाटतं श्रेयस अय्यर फिट असेल तर त्याला खेळवलं पाहिजे. खरे सांगायचे तर तो खूप सराव करत आहे. त्याने सर्वाधिक सराव केला आहे, त्याला खरोखरच घाम फुटला आहे. मला खात्री आहे की तो पाठीच्या दुखण्यातून बरा झाला आहे.” यावेळी आकाश चोप्राने टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना एक सूचना दिली.
विराट आणि रोहितला या सामन्यात विश्रांती द्यावी- आकाश चोप्रा
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी वरिष्ठ खेळाडूला विश्रांती देऊन अय्यरचा संघात समावेश करावा, असे चोप्रा म्हणाला. माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला, “काही लोकांना माझ्या बोलण्याचा राग येऊ शकतो, परंतु माझा विश्वास आहे की तुम्ही संघातील युवा खेळाडूंना खेळण्याची संधी द्यायला हवी. जे अनुभवी खेळाडू आहेत त्यांना जरी विश्रांती दिली तरी ते नंतर जुळवून घेतील.”
विशेष म्हणजे, भारताच्या माजी सलामीवीर आकाश चोप्राने बांगलादेशविरुद्धच्या लढतीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी ताजेतवाने ठेवण्याचा सल्ला दिला आहे. उल्लेखनीय बाब अशी आहे की, “कोहलीने या स्पर्धेत आतापर्यंत तीन डावात १२९ धावा केल्या आहेत.
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “वरिष्ठ खेळाडूंनी आधीच चांगली कामगिरी करून दाखवली आहे. मी रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल बोलत आहे. त्यामुळे जर मला श्रेयस अय्यरला खेळवायचे असेल आणि त्याला खेळवले पाहिजे असे मला वाटत असेल, तर मी विराटला विश्रांती घेण्यास सांगेन. जरी त्याने तसे केले नाही तरी संपूर्ण ऑगस्टमध्ये तो फारसा क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या शरीरावर फारसा परिणाम होणार नाही.”
आतापर्यंत सामन्यात काय झाले?
३० षटकांनंतर बांगलादेशने ४ गड्यांच्या मोबदल्यात १३७ धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार शाकिब अल हसन अर्धशतक करून ६८ धावांवर खेळत आहे. त्याला तौहीद हृदयॉयने चांगली साथ दिली, तो ३० धावांवर फलंदाजी करत आहे. दोघांमध्ये आता पाचव्या विकेटसाठी ७८ धावांची मजबूत भागीदारी झाली आहे.