IND vs BAN 1st T20 Match Highlights : टीम इंडियाने शानदार गोलंदाजीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय संघाने ग्वाल्हेर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा सात विकेट्स राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १९.५ षटकांत १२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ११.५ षटकांत तीन गडी गमावून १३२ धावा करून सामना जिंकला. भारतातर्फे सर्वाधिक धावा हार्दिकने केल्या, त्याने १६ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३९ धावा केल्या.

हार्दिकशिवाय कर्णधार सूर्यकुमारनेही आक्रमक फलंदाजी करत १४ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २९ धावा केल्या. पहिला सामना खेळणारा नितीश रेड्डीही १५ चेंडूत १६ धावा करून नाबाद परतला. तत्पूर्वी संजू सॅमसननेही शानदार फलंदाजी केली. त्याने १९ चेंडूचा सामना करताना ६ आकर्षक चौकारांच्या मदतीने २९ धावांचे योगदान दिले होते. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

बांगलादेशने केल्या होत्या १२७ धावा –

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १९.५ षटकांत सर्वबाद १२७ धावा केल्या. यादरम्यान मेहदी हसन मिराजने ३५ धावांची चांगली खेळी केली. त्याने ३२ चेंडूंचा सामना करत ३ चौकार मारले. झाकीर अलीने एका षटकाराच्या मदतीने ८ धावा केल्या. कर्णधार शांतोने २५ चेंडूत २७ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. तस्किन अहमदने १२ धावा केल्या. परवेझ हुसेनने ८ धावा केल्या. तर लिटन दास ४ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – Harmanpreet Kaur : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या मानेला गंभीर दुखापत, VIDEO व्हायरल

अर्शदीप-वरूणने केली शानदार गोलंदाजी –

अर्शदीप सिंगने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने १४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर वरुणने ३१ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मयंक यादव, हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा मयंकचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामना होता. त्याने ४ षटकात २१ धावा देऊन एक विकेट घेतली. तसेच त्याने एक मेडन ओव्हर देखील टाकली.