IND vs BAN India broke Pakistan’s record : भारतीय संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशचा १३३ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला. तिसऱ्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनने शतक तर सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. हार्दिक पंड्यानेही तुफानी खेळी केली. ज्यामुळे भारताने बांगलादेशला २९८ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ निर्धारित षटकात ७ बाद १६४ धावा करु शकला. या विजयाच्या जोरावर भारताने पाकिस्तान मोठा विक्रम मोडला आहे.
भारताने पाकिस्तानला टाकले मागे –
भारताने कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंत एकूण २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत पाकिस्तानला मागे टाकले आहे. पाकिस्तानने २०२१ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २० सामने जिंकले होते. भारतीय संघाला या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजूनही चार टी-२० सामने खेळायचे आहेत, जरी संघाने सर्व सामने जिंकले तरी ते युगांडाचा विश्वविक्रम मोडू शकणार नाही.
युगांडाने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० सामने जिंकले आहेत –
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम युगांडाच्या संघाच्या नावावर आहे. युगांडाने २०२३ साली टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २९ सामने जिंकले होते. टीम इंडियाने २०२२ मध्ये २८ सामने जिंकले होते. यंदाही भारतीय संघ चांगली कामगिरी करत असून एकापाठोपाठ एक नवीन विक्रम करत आहे. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जूनमध्ये टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकले आणि त्यादरम्यान भारतीय संघ एकही सामना गमावला नव्हता.
हेही वाचा – IND vs BAN : ६,६,६,६,६…संजू सॅमसनने केला कहर, एकाच षटकात तब्बल इतक्या षटकारांचा पाडला पाऊस, पाहा VIDEO
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारे संघ (*सुपर ओव्हरच्या विजयासह):
२९ – युगांडा (२०२३)
२८ – भारत (२०२२)
२१ – टांझानिया (२०२२)
२१ – भारत (२०२४)
२० – पाकिस्तान (२०२१)
हेही वाचा – IND vs BAN : भारतीय संघाने दसऱ्यालाच साजरी केली दिवाळी, उत्तुंग फटकेबाजीसह दणदणीत विजय
संजू सॅमसनने झळकावले झंझावाती शतक –
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने झंझावाती शतक झळकावले. सॅमसनने केवळ ४७ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने १११ धावा केल्या, जे रोहित शर्मा (35 चेंडू) नंतर भारतीयाचे दुसरे सर्वात वेगवान टी-२९ शतक आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सहा गड्यांच्या मोबदल्यात २९७ धावा केल्या, ही या फॉरमॅटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ७ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १६४ धावा करू शकला. भारतातर्फे वेगवान गोलंदाज मयंक यादवने ३२ धावांत २ आणि लेगस्पिनर रवी बिश्नोईने ३० धावांत तीन बळी घेतले. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सांघिक धावसंख्येचा विक्रम नेपाळच्या नावावर आहे, ज्याने ३१४ धावा केल्या होत्या.