India broke Australia’s record for fastest 200 runs in Tests : कानपूरमध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करत आपला पहिला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडत इतिहास रचला आहे. भारतीय संघ कसोटी प्रकारात सर्वात जलद २०० धावा करणारा संघ ठरला आहे. विशेष म्हणजे या सामन्यातच भारताने जलद ५० आणि १०० धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला –
या सामन्यात भारताने २५ षटकात २०४ धावा करत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने २०१७ मध्ये हा विक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाने सिडनीमध्ये पाकिस्तानविरुद्ध २८.१ षटकांत ही कामगिरी केली होती. मात्र, आता भारताने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारताने इंग्लंडचा विक्रम मोडला –
तत्पूर्वी टीम इंडियाच्या पहिल्या डावाला सुरुवात करताान सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० धावा करत भारतासाठी विश्वविक्रम केला होता. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. यंदा ट्रेंट ब्रिजवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने अवघ्या ४.२ षटकांत ५० धावांचा टप्पा गाठला होता. आता रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी अवघ्या ३ षटकांत ५० धावांचा टप्पा पार करत विश्वविक्रम मोडला. यानंतर टीम इंडियाने जलद १०० धावा करण्याचा स्वत:चा विक्रमही मोडला.
हेही वाचा – IND vs BAN : विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
भारताने स्वतःचाच विक्रम मोडला –
टीम इंडियाने कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी इतिहास घडवला. सर्वात जलद १०० धावा करण्याचा विक्रम केला. अवघ्या १०.१ षटकात १०३ धावा करत भारताने आपलाच विक्रम मोडला आहे. यापूर्वी भारताने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० धावा करण्याचा पराक्रम केला होता. भारताने २०२३ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत सर्वात जलद १०० धावा केल्या होत्या. त्यावेळी भारताने १२.२ षटकात १०० धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने श्रीलंकेचा विक्रम मोडला. श्रीलंकेने २००१ साली बांगलादेशविरुद्ध १३.१ षटकात सर्वात जलद १०० धावा करण्याचा पराक्रम केला होता.