IND vs BAN 3rd T20I Hyderabad Weather Updates : भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. या मालिकेतील तिसरा सामना आता हैदराबादमध्ये होणार आहे. हा सामना १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ हैदराबादला पोहोचले आहेत. याआधीच मालिका जिंकलेल्या टीम इंडियाला हा सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप करायची संधी आहे, पण या सामन्यापूर्वी टीम इंडिया आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रद्द होऊ शकतो.

तिसरा सामना का रद्द केला जाऊ शकतो?

उभय संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पावसाचा परिणाम दिसून येईल. या सामन्यात पावसाची शक्यता आहे. हवामान अहवालानुसार १२ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये पावसाची ४०% शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास सामना रद्द करावा लागू शकतो. त्यामुळे टीम इंडिया बांगलादेशला क्लीन स्वीप करू शकणार नाही. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या मालिकेत टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

या दोन खेळाडूंवर असणार विशेष लक्ष –

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान हा सामना खेळला गेला आणि पावसाचा प्रभाव दिसला नाही, तर चाहत्यांच्या नजरा नितीश कुमार रेड्डी आणि अभिषेक शर्मा यांच्यावर असतील. हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे आयपीएलमधील या दोन्ही खेळाडूंचे घरचे मैदान आहे. आयपीएल २०२२ दरम्यान या दोन्ही खेळाडूंनी हैदराबादमध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. अशा परिस्थितीत हे दोन्ही खेळाडू हैदराबादमध्ये अप्रतिम कामगिरी करतील, अशी आशा चाहत्यांना आहे.

हेही वाचा – IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूची उपकर्णधारपदी लागली वर्णी

तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

भारत : जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताची वाढवली डोकेदुखी, टीम इंडिया कशी पोहोचणार उपांत्य फेरीत?

बांगलादेश : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदयॉय, महमुदुल्लाह, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन शकीब, मुस्तफिजुर रहमान.