भारताचा कर्णधार केएल राहुलने कबूल केले की संघाला दुसऱ्या डावात कुलदीप यादवची उणीव भासली. पण बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून या डावखुऱ्या मनगट स्पिनरला बाहेर ठेवल्याचा त्याला कोणताही पश्चाताप नाही. चितगावमधील पहिल्या कसोटीत भारताच्या १८८ धावांच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कुलदीपला जयदेव उनाडकटला अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून ठेवल्यामुळे दुसऱ्या सामन्यातून वगळण्यात आले होते, ज्यावर सुनील गावसकरसह अनेक माजी खेळाडूंनी टीका केली होती.
टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ३ विकेट्सने जिंकला. यासह भारताने २ सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या प्लेइंग-११ बाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, कारण सुरुवातीच्या सामन्यात चांगली कामगिरी करूनही चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला वगळण्यात आले होते. यावर आता कार्यवाहक कर्णधार केएल राहुलने वक्तव्य केले आहे.
आपल्या निर्णयावर केएल राहुल ठाम
सामन्यानंतर आपल्या निर्णयाचा बचाव करताना राहुल पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप नाही. तो योग्य निर्णय होता. विकेटवर नजर टाकली तर आमच्या वेगवान गोलंदाजांनीही भरपूर विकेट घेतल्या आणि त्यांना खेळपट्टीची मदतही मिळत होती. खेळपट्टीमध्ये खूप असमान उसळी होती. एकदिवसीयमध्ये खेळण्याच्या आमच्या अनुभवाच्या आधारे आम्ही हा निर्णय घेतला. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना येथे मदत मिळत असल्याचे आम्ही पाहिले. हा एक संतुलित संघ आहे आणि मला वाटते की आमचा निर्णय योग्य होता.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “आयपीएल २०२३ मध्ये प्रभावशाली खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर) नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम कसोटी सामन्यातही असता तर मला कुलदीपला दुसऱ्या सामन्यातही आणायला नक्कीच आवडले असते. तो एक कठीण निर्णय होता. गेल्या सामन्यात त्याने आम्हाला बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून दिला, हे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची बाब आहे. तो सामनावीर ठरला.
कुलदीपला सामनावीराचा किताब मिळाला
कुलदीपने २२ महिन्यांनंतर शानदार पुनरागमन करत पहिल्या कसोटी सामन्यात आठ विकेट्स घेतल्या आणि ४० धावांची लढाऊ खेळीही खेळली. या कसोटीत त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. राहुल म्हणाला, “खासकरून पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला बाहेर ठेवणे, हा निर्णय कठीण होता. पण सामन्याच्या एक दिवस आधी खेळपट्टी पाहिल्यानंतर आम्हाला वाटले की वेगवान गोलंदाजांना मदत होईल आणि म्हणूनच आम्ही सर्वोत्तम आणि संतुलित संघ मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.”