IND vs BAN 2nd T20I Updates: भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना बुधवारी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी बांगलादेशच्या ३८ वर्षीय खेळाडूने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

बांगलादेशचा सर्वात अनुभवी खेळाडू महमुदुल्लाहने दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. महमुदुल्लाह भारताविरूद्ध आपली अखेरची टी-२० मालिका खेळत आहे. म्हणजेच दोन सामन्यांनंतर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर या फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार नाही.

हेही वाचा – IND vs BAN T20 Live Score : वादळी सुरुवातीनंतरही भारताला तिसरा धक्का, कर्णधार सूर्यकुमार यादवही बाद

बांगलादेशच्या या ३८ वर्षीय खेळाडूने २००७ मध्ये केनियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि वयाच्या ३८व्या वर्षी त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. शाकिब अल हसन आणि झिम्बाब्वेचा शॉन विल्यमसन यांच्यानंतर टी-२० मधील त्याची तिसरी सर्वात मोठी कारकीर्द आहे. महमुदुल्लाह हा बांगलादेशसाठी टी-२०मधी सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. बांगलादेशच्या कोणत्याही खेळाडूने त्याच्यापेक्षा जास्त टी-२० सामने खेळलेले नाहीत, तर या फॉरमॅटमध्ये फक्त एका खेळाडूने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND-W vs SL-W Live score: शफाली-स्मृतीचा आक्रमक फलंदाजीचा प्रयत्न, श्रीलंकेकडूनही शानदार गोलंदाजी

महमुदुल्लाह हा उजव्या हाताचा फलंदाज असून त्याने आतापर्यंत १३९ टी-२० सामने खेळले असून ८ अर्धशतकांच्या मदतीने त्याने २३९५ धावा केल्या आहेत. बांगलादेशसाठी फक्त शाकिब अल हसनने टी-२० मध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. महमुदुल्लाहने आपल्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीसह टी-२० मध्ये ४० विकेट्सही घेतल्या आहेत. महमुदुल्लाहने पत्रकार परिषदेत टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.