IND vs BAN 1st T20I Probable playing 11 and Pitch Report : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ग्वाल्हेरमध्ये पहिला सामना खेळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही संघ ग्वाल्हेरमध्ये पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध टी-२० सामना खेळणार आहेत. ग्वाल्हेरमध्ये नवीन स्टेडियम बांधण्यात आले आहे. जिथे हा सामना होणार आहे. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळू शकते.

बांगलादेशला टीम इंडियाविरुद्ध विजय मिळवणे सोपे नसेल. कारण टीम इंडिया खूप मजबूत स्थितीत आहे. पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारत अभिषेक शर्मा आणि सॅमसनला सलामीची संधी देऊ शकतो. रियन पराग आणि हार्दिक पंड्याची जागा जवळपास निश्चित झाली आहे. रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनाही संधी मिळू शकते. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.

टीम इंडियाकडे मजबूत गोलंदाजी आक्रमण –

भारत अनुभवी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवू शकतो. अर्शदीपने अनेक प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यासोबत मयंक यादवलाही संधी मिळू शकते. इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या सत्रात मयंकने आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आला होता. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईची जागा जवळपास निश्चित झाली आहे.

हेही वाचा – IND vs BAN : भारत-बांगलादेश टी-२० मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार? जााणून घ्या

खेळपट्टीचा अहवाल –

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यापूर्वी श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप चांगली असेल अशी अपेक्षा आहे. खेळपट्टी पाहता ती ४० षटकांपर्यंतच्या सामन्यांसाठी योग्य असेल असे वाटते. या स्टेडियममधील सरळ सीमा लहान आहे. अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांची योजना बिघडू शकते. ग्वाल्हेरची खेळपट्टी सुरुवातीला संथ राहू शकते. मात्र, येथील खेळपट्टीवर अद्याप एकही सामना खेळला गेला नाही. त्यामुळे आत्ताच काही सांगणे घाईचे ठरेल.

भारत विरुद्ध बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेवन –

भारत: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मयंक यादव.

हेही वाचा – Rahul Chahar : भारतीय क्रिकेटपटूच्या वडिलांची लाखोंची फसवणूक, जीवे मारण्याचीही दिली धमकी, गुन्हा दाखल

बांगलादेश : लिटन दास (यष्टीरक्षक), तन्झीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदयो, महमुदुल्लाह, जेकर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तन्झीम हसन साकिब.