IND vs BAN Mohammed Shami breaks Zaheer Khan record With 200 ODI Wickets : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे आयसीसी स्पर्धांवरील प्रेम अबाधित आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात १८ सामन्यांमध्ये ५५ विकेट्स घेणाऱ्या शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पण धुमाकूळ घातला आहे. दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या शमीने काही दिवसांपूर्वीच पुनरागमन केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शमीने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स घेत वनडेत २०० विकेट्स पूर्ण करत झहीर खानचा मोठा विक्रम मोडला आहे.

मोहम्मद शमीने मोडला झहीर खानचा विक्रम –

या सामन्यात मोहम्मद शमीने बांगलादेशविरुद्ध तिसरी विकेट घेत इतिहास घडवला आहे. तो मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने झहीर खानला मागे टाकले आहे. शमी मर्यादित षटकांच्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने झहीर खानला मागे टाकले, ज्याने ४४ सामन्यांमध्ये ७१ विकेट्स घेतल्या होत्या. पण आता शमीने ३३ सामन्यांमध्ये ७२ विकेट्स घेत एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे.

याशिवाय, मोहम्मद शमी एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद २०० विकेट्स घेणारा जगातील दुसरा गोलंदाज बनला आहे. मात्र, त्याने २०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ५१२६ चेंडू टाकले. या बाबतीत त्याने धोकादायक ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कला मागे टाकले. मिचेल स्टार्कने ५२४० चेंडूत ही कामगिरी केली होती.

सर्वात कमी चेंडूंत २०० एकदिवसीय विकेट्स पूर्ण करणारे गोलंदाज:

  • ५१२६ चेंडू – मोहम्मद शमी
  • ५२४० चेंडू – मिचेल स्टार्क
  • ५४५१ चेंडू – सकलेन मुश्ताक
  • ५६४० चेंडू – ब्रेट ली
  • ५७८३ चेंडू – ट्रेंट बोल्ट
  • ५८८३ चेंडू – वकार युनूस

२०० विकेट्स घेणारा आठवा भारतीय गोलंदाज –

४३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर झाकीर अलीला बाद करून शमीने एकदिवसीय सामन्यात २०० विकेट्स पूर्ण केले. झाकीर आणि तौहीद यांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. शमीने त्याला बाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. तो भारताकडून एकदिवसीय सामन्यात २०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा आठवा गोलंदाज ठरला.

त्याच्या पुढे अनिल कुंबळे (३३४ विकेट्स), जवागल श्रीनाथ (३१५), अजित आगरकर (२८८), झहीर खान (२६९), हरभजन सिंग (२६५), कपिल देव (२५३) आणि रवींद्र जडेजा (२२६) आहेत. शमीने तंजीम हसन शाकिबला (०) बाद करून सामन्यातील त्याची चौथी विकेट घेतली. त्याने तस्किन अहमद (३) ला श्रेयस अय्यरकडून झेलबाद करून आपली पाचवी विकेट पूर्ण केली. त्याने १० षटकांत ५३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.

Story img Loader