बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाने सलग दुसरा एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करत मालिका गमावली आहे. यापूर्वी २०१५ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका गमावली होती. आता यजमान बांगलादेशने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाविरुद्ध २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा म्हणजेच तिसरा सामना आता १० डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन खेळू शकणार नाहीत. तिघेही दुखापतीमुळे बाहेर आहेत.
बांगलादेशकडून एकदिवसीय मालिकेत भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघावर जगभरातून टीका होत आहे. भारतीय दिग्गज खेळाडूंनीही संघावर जोरदार निशाना साधत तोफ डागली आहे. वीरेंद्र सेहवाग आणि व्यंकटेश प्रसाद यांनी तर टीम इंडियाच्या क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी संघात बदलाचा आग्रह धरला. सेहवागने तर ट्विट करून सांगितले की, “टीम इंडियाची कामगिरी ही क्रिप्टोकरन्सी पेक्षा वेगाने घसरत आहे. ही भारतीय संघ व्यवस्थापनाला सतर्क होण्याची हीच वेळ आहे. आता जागे नाही होणार तर मग कधी होणार? जशी हातातून वाळू निसटते त्याप्रमाणे हळूहळू वेळ ही निसटून चालली आहे.”
भारताला कठोर निर्णय घेण्याची गरज आहे
दुसरीकडे, भारतीय निवड समितीचा प्रमुख होण्याच्या शर्यतीत असलेल्या व्यंकटेश प्रसादने भारतीय संघावर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली. त्याने ट्विट केले की, “भारत जगभरात अनेक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहे, परंतु जेव्हा मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्याचा विचार येतो तेव्हा आमचा दृष्टीकोन अनेक दशके जुना आणि संकोचित स्वरूपाचा दिसतो आहे. २०१५ विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद झाल्यानंतर इंग्लंडने कडक आणि कठोर निर्णय घेतले आणि त्यानंतर तो आता कुठे जाऊन एक महान संघ बनला. भारतालाही असेच कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.”
आयपीएल सुरू झाल्यानंतर खूप मोठे झाले नुकसान
भारताचे माजी दिग्गज व्यंकटेश प्रसाद पुढे म्हणाले की, दृष्टिकोन बदला. आयपीएल सुरू झाल्यापासून, आम्ही एकही टी२० विश्वचषक जिंकलेला नाही आणि गेल्या ५ वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्येही खराब झाले आहे. त्यांच्या चुकांपासून धडा घेणे आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये महान संघ बनणे तर दूरच. त्यांनी बदलाचा आग्रह धरला. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावण्यापूर्वी भारताने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकाही गमावली होती. भारताने सलग दोन एकदिवसीय मालिका गमावली आहे. बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय क्रिकेटच्या प्रतिष्ठेलाही खूप तडा गेला.