IND vs BAN 1st T20 Prohibitory Orders Imposed In Gwalior : कसोटी मालिका २-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघ आता ६ ऑक्टोबरपासून बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. रविवारी होणाऱ्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी ग्वाल्हेरमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. जेणेकरून सामना सुरळीतपणे आयोजित करता येईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात निषेध आणि विशेषतः सोशल मीडियावर प्रक्षोभक सामग्री पसरवण्यावर बंदी घातली आहे.
हा आदेश कधीपर्यंत लागू राहणार?
हा आदेश ७ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. हिंदू महासभेने सामन्याच्या दिवशी (६ ऑक्टोबर) ग्वाल्हेर बंदची हाक दिली आहे. याशिवाय अन्य संघटनांनीही आंदोलन करण्याचा इशारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या ‘अत्याचार’प्रकरणी रविवारचा सामना रद्द करण्याची मागणी करत हिंदू महासभेने बुधवारी निदर्शने केली.
कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात आली –
पोलीस अधीक्षकांच्या शिफारशीवरून जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस) च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. या आदेशानुसार, जिल्ह्याच्या हद्दीतील कोणत्याही व्यक्तीने सामन्यात व्यत्यय आणल्यास किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकावल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय आक्षेपार्ह किंवा भडकाऊ भाषा आणि संदेश असलेल्या बॅनर, पोस्टर्स, कट-आउट्स, झेंडे आणि इतर गोष्टींवरही बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा – Irani Cup: अंगात १०२ डिग्री ताप असतानाही शार्दूल ठाकूरने केली शानदार फलंदाजी; बाद होताच थेट रुग्णालयात
१४ वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये सामना –
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियममध्ये १४ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार आहे. या स्टेडियमची एकूण प्रेक्षक क्षमता ३० हजार आहे. सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी सुमारे १,६०० पोलिस तैनात करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खेळाडूंना विमानतळावरून हॉटेलवर आणण्यासाठी आणि हॉटेलमधील सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. यासोबतच दोन्ही संघांना हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत नेण्यासाठी टीममध्ये अधिकारी आणि शिपाई स्वतंत्रपणे तैनात करण्यात आले आहेत. ज्या मार्गाने खेळाडू मैदानात येतील त्या मार्गावर सुरक्षेसाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात येणार आहे.